हायलाइट्स:
- आंध्र प्रदेशातील अनंतपूर आणि कुरनूल येथील रुग्णालयांत ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने १६ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
- रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी नाही, मुख्य आरोग्य सचिवांनी दिले स्पष्टीकरण
- रुग्णांच्या मृत्यूला कोण जबाबदार? मृत्यूमागील कारण अद्याप अस्पष्ट
अनंतपूरचे जॉइंट कलेक्टर निशांत कुमार यांनी सांगितले की, अनंतपूरच्या जीजीएचमध्ये शुक्रवारी २१ रुग्णांचा मृत्यू झाला. पण रुग्णांच्या मृत्यूमागील कारण त्यांनी स्पष्ट केले नाही. रुग्णांचा मृत्यू हा ऑक्सिजनचा पुरवठा खंडीत झाल्याने रुग्ण दगावल्याच्या वृत्ताला जीजीएचच्या डॉक्टरांनी दुजोरा दिला आहे.
ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे, ती चेन्नईहून आलेल्या पथकाकडून दुरुस्त केली जात आहे, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. दुसरीकडे अनंतपूरचे जिल्हाधिकारी जी. चंद्रुडू यांनी सांगितले की, जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता नाही. मात्र, पुरवठ्यात कमी दाब असल्याच्या तक्रारी आहेत, त्यामुळे पुरवठा होणारी वाहिनी तपासली जात आहे.
मुख्य आरोग्य सचिवांनी या घटनेनंतर स्पष्टीकरण दिले आहे. रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झालेला नाही. त्याचवेळी आमदार अनंत वेंकटरमी रेड्डी यांनी अनंतपूर येथील जीजीएच रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी डॉक्टर आणि इतर रुग्णांशी चर्चा केली. रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले की, ऑक्सिजनची कमतरता नाही. मात्र, मृतांच्या नातेवाइकांनी ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे, असे रेड्डी यांनी माध्यमांना सांगितले.
अनंतपूर येथील घटना ताजी असतानाच, शनिवारी कुरनूल येथील एका खासगी रुग्णालयात पाच करोना रुग्णांचा मृत्यू झाला. नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप या रुग्णालय व्यवस्थापनावर केला आहे. सरकारची परवानगी नसताना या रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार केले जात होते, असा आरोप आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय संचालकांना अटक केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच रुग्णालय व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.