याबाबत विभागीय आयुक्त राव म्हणाले, ‘पुणे जिल्ह्यासाठी दररोज ३२५ टन ऑक्सिजनची गरज भासते. मागणीप्रमाणे ऑक्सिजनचा पुरवठा होऊ लागला आहे. कर्नाटकातील बेल्लारी येथून दररोज ४० टन, गुजरातमधील जामनगर येथून ४० टन आणि रायगड येथील डोल्व्ही कंपनीकडून ३५ टन ऑक्सिजनचा पुरवठा होऊ लागला आहे. लिंडे कंपनीच्या तळोजा आणि मुरबाड येथील प्रकल्पांतून १२० टन ऑक्सिजन प्राप्त होत आहे. याशिवाय पुणे जिल्ह्यातील एअर लिक्विड, आयनॅाक्स या कंपन्यांतून प्रत्येकी ४० टन, तर टायो निप्पॅान या कंपनीकडून ३० टन ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. त्यामुळे आता ऑक्सिजनचा पुरवठा नियंत्रणात आला आहे.’
‘रुग्णालयांकडून ऑक्सिजनचा योग्य प्रमाणात वापर व्हावा, यासाठी ऑक्सिजन ऑडिट करण्यात येत आहे. त्यामध्ये आढळून येणाऱ्या त्रुटी दुरुस्त करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे ऑक्सिजनची बचत होऊ लागली आहे,’ असे राव यांनी स्पष्ट केले.
दररोज नऊ टन ऑक्सिजनची बचत
‘पिंपरी-चिंचवड महापालिकेत हद्दीतील जम्बो सेंटर आणि यशवंतराव चव्हाण रुग्णालयाला भेट देण्यात आली. त्यामध्ये ऑक्सिजन वापराचे ऑडिट करून काही सूचना देण्यात आल्या. या दोन्ही ठिकाणी दररोज ४५ टन ऑक्सिजनचा वापर केला जात होता. हे प्रमाण आता ३६ टनावर आले आहे. ऑक्सिजन ऑडिट केल्यामुळे दररोज नऊ टन ऑक्सिजनची बचत होत आहे,’ अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
बेल्लारी, जामनगर आणि रायगडमधून ११५ टन ऑक्सिजनचा पुरवठा होऊ लागला आहे. परिणामी ऑक्सिजनचा पुरवठा नियंत्रणात आला आहे. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील रुग्णालयांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होत आहे.
– सौरभ राव, विभागीय आयुक्त