Home शहरे पुणे ऑक्सिजन बचतीसाठी प्रशिक्षण गरजेचे

ऑक्सिजन बचतीसाठी प्रशिक्षण गरजेचे

0
ऑक्सिजन बचतीसाठी प्रशिक्षण गरजेचे

शहरातील रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र असले, तरी ऑक्सिजनची मागणी अद्याप घटलेली नाही. ऑक्सिजनच्या मागणीत वाढत होत असल्याने ऑक्सिजन पुरवठा करताना जिल्हा प्रशासन आणि औषध प्रशासनाची (एफडीए) दमछाक होत आहे. याबाबत ‘एफडीए’चे पुणे विभागाचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांच्याशी साधलेला हा संवाद…


सध्या ऑक्सिजनची मागणीचे चित्र कसे आहे?

– रुग्णसंख्या कमी होत असली तरी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या कमी होत नसल्याचे दिसत आहे. बाहेरील जिल्ह्यातील रुग्ण उपचारांसाठी पुण्यात येत आहेत. त्यांनाही ऑक्सिजन, व्हेंटिलेटर लागत आहे. ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्याही कमी झालेली नाही. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी कायम आहे.

ऑक्सिजनची उपलब्धता, उत्पादन आणि पुरवठ्याबाबत काही सांगाल का ?

– सध्या पुणे शहर जिल्ह्याला ३५० ते ३७० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरत आहे. सध्या ३२० टन ऑक्सिजन उपलब्ध होत असून, उर्वरित ऑक्सिजनचा पुरवठा बाहेरून करण्याची वेळ येते. सध्या मुरबाड येथून ४० टन ऑक्सिजन आणावा लागतो. तेथून तांत्रिक कारणामुळे ४० टन ऑक्सिजन उपलब्ध झाला नाही, तर दुसऱ्या ठिकाणावरून त्याची तजवीज करावी लागते.

प्रश्न – ऑक्सिजनचा तुटवडा का भासत आहे?

– पुणे जिल्ह्यात उत्पादन झालेला ऑक्सिजन विदर्भ, मराठवाडा, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना द्यावा लागतो. पुण्याबाहेरील जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने तेथून मागणी वाढत आहे. त्यामुळे सरकारच्या सूचनेनुसार तो पुरवावा लागतो. ऑक्सिजनवरील रुग्णांना बरे होऊन डिस्चार्ज मिळण्यास सुरुवात झाल्यास ऑक्सिजनची मागणी कमी होईल. ऑक्सिजनची मागणी एक ते दोन आठवड्यात कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे थोडासा दिलासा मिळेल.

ऑक्सिजनच्या बचतीसाठी काय करावे?

– रुग्णालयातील परिचारिकांनी ऑक्सिजन वापरावर काटेकोर देखरेख केली पाहिजे. ऑक्सिजन किती वापरला जात आहे, याबाबत रुग्णालयाने एखाद्या व्यक्तीला नियुक्त करून त्याच्यामार्फत ऑक्सिजन वापरावर लक्ष ठेवले पाहिजे. परिचारिकांना ऑक्सिजन वापराबाबत प्रशिक्षण दिले, तर त्याचा फायदा होईल. सुमारे २० ते ३० टक्के ऑक्सिजन आपण वाचवू शकतो. त्याचा फायदा अन्य रुग्णांना होऊ शकतो. ऑक्सिजनचा अनावश्यक वापर होत नाही ना, याकडे लक्ष दिले पाहिजे. ऑक्सिजनची गळती होऊ नये यासाठी यासाठी रुग्णालयांनी वारंवार संबंधित यंत्रणांची तपासणी केली पाहिजे. त्यामुळे साधारणतः २० टक्के ऑक्सिजन वाचवू शकतो.

Source link