ऑक्सिजन बेडअभावी आईचा मृत्यू; मुलीची सॅनिटायझर पिऊन आत्महत्या

ऑक्सिजन बेडअभावी आईचा मृत्यू; मुलीची सॅनिटायझर पिऊन आत्महत्या
- Advertisement -

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी: दिंडोरी तालुक्‍यातील रामशेज आशेवाडी येथील करोनाबाधित महिलेचा ऑक्सिजन बेडअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. दुर्दैवाची बाब म्हणजे या महिलेचा मृत्यू झाल्याचे समजताच तिच्या करोनाबाधित तरुण मुलीनेदेखील घरीच सॅनिटायझर प्राशन करीत आत्महत्या केल्याने ग्रामस्थांनी यंत्रणेविरोधात संताप व्यक्त केला आहे.

येथील जया लक्ष्मण भुजबळ (वय ५०) यांना शनिवारी पहाटे श्वास घेण्यास त्रास होत असल्याने नाशिकरोड येथील बिटको कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेथे ऑक्सिजन बेड न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही बाब करोना झाल्याने घरीच असलेल्या त्यांच्या तरुण मुलीला समजल्यानंतर तिने सॅनिटायझर प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्‍न केला. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारांदरम्यान तिचादेखील मृत्यू झाल्याने गावात संताप अन् हळहळ व्यक्त करण्यात आली. गावामध्ये योग्य उपचारांअभावी दहा ते बारा दिवसांत सहावा बळी गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने याकडे अजूनही दुर्लक्ष केल्याने अजून किती मृत्यूंची वाट प्रशासन बघत आहे, असा प्रश्न संतप्त ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.

ग्रामपंचायतीची बघ्याची भूमिका

गावामध्ये विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी युवावर्ग प्रयत्न करीत असून, ग्रामपंचायत प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे, असा आरोप होत आहे. गावामध्ये ग्रामसेवक नसून, अतिरिक्त कार्यभार शेजारील गावच्या ग्रामसेवकाकडे आहे. त्यामुळे कामकाजावर मर्यादा येत आहेत. प्रशासनाने येथे तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Source link

- Advertisement -