ऑस्ट्रेलिया आणि भारताचे सांस्कृतिक, वाणिज्यिक संबंध वृद्धिंगत व्हावेत – ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री ॲन्थोनी अल्बानीज

ऑस्ट्रेलिया आणि भारताचे सांस्कृतिक, वाणिज्यिक संबंध वृद्धिंगत व्हावेत – ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री ॲन्थोनी अल्बानीज
- Advertisement -

मुंबई, दि. 9;       ऑस्ट्रेलिया आणि भारताचे सांस्कृतिक, वाणिज्यिक संबंध वृद्धिंगत व्हावेत यासाठी ऑस्ट्रेलियन शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री ॲन्थोनी अल्बानीज  यांनी दिली. ऑस्ट्रेलियन सरकारतर्फे हॉटेल ताज येथे ऑस्ट्रेलियन पर्यटन, संस्कृती, खाद्य पदार्थ आणि पेयपदार्थ संस्कृती, तसेच चित्रपटसृष्टी यासंदर्भातील व्यवसाय वृद्धी संदर्भात चर्चा करणासाठी व्यवसाय परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, ऑस्ट्रेलियाचे सिनेटर डॉन फॅरेल, उद्योग आणि सांस्कृतिक मंत्री मॅडेलिन किंग, ऑस्ट्रेलियाचे संसाधन मंत्री तसेच ऑस्ट्राट्रेड या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी झेवियर सायमोनेट, ऑस्ट्रेलियाचे भारतातील वाणिज्य दूत बेरी ओ फॅरेल यांच्यासह  उद्योजक, अभिनेते, अभिनेत्री, पर्यटन व्यवसायिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

श्री. ॲन्थोनी अल्बानीज म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी नुकत्याच झालेल्या भेटीत श्री.मोदी यांनी ऑस्ट्रेलिया आणि भारतातील व्यावसायिक संबध वृद्धिंगत करण्यासाठी सकारात्मकता दाखविली आहे.

ते पुढे म्हणाले,  ऑस्ट्रेलियात पर्यटनासाठी अनेक भारतीय येत असतात. ऑस्ट्रेलियाहून येणारे ड्राय फ्रुटस, पेय आणि खाद्यपदार्थ भारतात पसंत केले जातात. भारतातून ऑस्ट्रेलियाला 85 टक्के निर्यात तर 96 टक्के आयात होते.  त्यात शेळीचे मांस, ॲव्हाकॅडो, सी फूड, ड्राय फ्रूट्स आणि उच्च दर्जाचे  पेय याचा समावेश आहे.

क्रिकेट आणि चित्रपट या दोन्हींबाबत दोन्ही देशांतील लोकांना सारखेच प्रेम असल्याचे सांगून श्री. अल्बानीज पुढे म्हणाले, अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण ऑस्ट्रेलियामध्ये होत असते.  यापुढेही दोन्ही देशांतील चित्रपटसृष्टीतील लोक एकत्र आल्यास चित्रपट निर्मितीला नवे आयाम प्राप्त होतील.

यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री ॲन्थोनी अल्बानीज यांनी त्यांच्या प्रदेशातील खाद्य पदार्थ स्वत: तयार करुन खाऊ घातले. मुंबईतील डबेवाल्यांच्या संघटनेकडून देण्यात आलेल्या बाजरीची भाकरी आणि ऑस्ट्रेलियन पद्धतीने तयार केलेल्या मशरुमच्या भाकरीचा त्यांनी आस्वाद घेतला. मुंबईच्या डबेवाल्यांनी पारंपरिक टोपी आणि डब्याची प्रतिकृती श्री. ॲन्थोनी अल्बानीज यांना भेट दिली.

- Advertisement -