कोल्हापूर: ओएलएक्स अॅपवरून वाहन खरेदी करणाऱ्या तरुणाला दोन लाख ३१ हजार ८८० रुपयांचा गंडा घातला. राहुल हिंदुराव काटकर (वय ३५, रा. माळवाडी, टोप, ता. हातकणंगले) असे त्यांचे नाव आहे. पैसे देऊनही चारचाकी वाहन न मिळाल्याने त्यांनी कोल्हापूर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
काटकर शेती करतात. त्यांना ओएलएक्स अॅपवर ह्युदाई कंपनीची पांढऱ्या रंगाची क्रेटा मोटार विक्रीची जाहिरात पाहायला मिळाली. कार आवडल्याने त्यांनी अॅपवरील विशालशी संपर्क साधला. आपण आर्मीमध्ये असल्याने कारवर टॅक्स बसणार नसल्याचे सांगून त्याने मोटार पाच लाख २० हजार रुपयांना विकणार असल्याचे सांगितले. फिर्यादी काटकर यांनी विशाल, आर्मी ड्रायव्हर देवेंद्र सिंग, कुरिअर बॉय राकेश, संजना पीएस यांच्याशी मोबाइलवर चर्चा करून पेटीएमद्वारे दोन लाख ३१ हजार रुपये विशालला दिले. पण पैसे दिल्यानंतर मोटार न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर काटकर यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.