Home ताज्या बातम्या ओडिशामधील लोक कलाकारांनी जिंकली मुंबईकरांची मने!

ओडिशामधील लोक कलाकारांनी जिंकली मुंबईकरांची मने!

0
ओडिशामधील लोक कलाकारांनी जिंकली मुंबईकरांची मने!

मुंबई, दि. २९- : ओडिशातील डालखाई, ढाप, चुटकू चुटा, रंगबती अशा एकापेक्षा एक बहारदार लोककला प्रकारातील सादरीकरणातून, पहिला दिवस ओडिशाच्या कलाकारांनी गाजवला, निमित्त होते ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत आंतरराज्य सांस्कृतिक देवाण-घेवाण उपक्रमाचे!

सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आज मुंबईच्या गिरगावातील साहित्य संघ मंदिरात उद्घाटन झाले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव विद्या वाघमारे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे तसेच प्राध्यापक डॉ अनुराधा पोतदार जव्हेरी, श्रीराम पांडे, शिल्पा कवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रचंड ऊर्जा, ठेका धरायला लावणारा ताल, आकर्षक वेशभूषा आणि पदलालित्य यांचा अनोखा संगम आज ओडीशामधील कलाकारांच्या सादरीकरणातून पहावयास मिळाला. तीन दिवस चालणाऱ्या या लोकोत्सव कार्यक्रमात महाराष्ट्र व ओडिशा मधील अनेक कलाकार सहभागी झाले आहेत.

पहिल्या दिवसाच्या उद्घाटनानंतर ओडिशामधील कलाकार गुरु श्री डॉक्टर मोहित कुमार, चंद्रशेखर दुबे, सुमित प्रधान, मनोज प्रधान, संगीता भोई, राजश्री राहू, किरण साहू, मानसी सेठ, पूजा मुंडा, राघव सुना, नारायण, अर्ज,अजय सुना प्रभाकर आणि बासू या कलाकारांनी; ढोल, निसान, तासा, झांज, मोहरी/ बासुरी कोसताल, रामताली अशा लोकवाद्यांच्या माध्यमातून आकर्षक सादरीकरणे केली.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात महाराष्ट्रातील प्रसिद्ध ओडिसी नृत्य कलाकार शुभदा वराडकर, मिताली वराडकर तसेच त्यांच्या सहकलाकारांनी शास्त्रीय संगीत नृत्य याचे रोमांचकारी सादरीकरण केले. “वंदे मातरम, गीत गोविंद” यावर आधारित लक्षवेधी नृत्य मुंबईकरांनी अनुभवले.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत महाराष्ट्र व ओडिशा या दोन्ही राज्यात आंतरराज्य सांस्कृतिक देवाणघेवाण  होण्यासाठी या विविध उपक्रमाचे आयोजन होत असते. महाराष्ट्रात संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात, ओडिशा व महाराष्ट्र राज्यातील विविध नृत्य,संगीत, लोककला याचे अनोखे दर्शन घडणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात, दि. ३० जुलै २०२२ रोजी ओडीसी भक्तीसंगीताचे , सादरीकरण मनोज कुमार पांडा व सहकलाकार तर महाराष्ट्रातील भक्ती संस्कृतीचे सादरीकरण संजिवनी भेलांडे आणि सहकलाकार करणार आहेत. दि. ३१ जुलै रोजी राकेश शिर्के आणि सहकलाकार यांच्या महाराष्ट्रातील सर्वांग लोककला व ओडिशा  येथील  प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य कलाकार श्री. वसंतकुमार प्रदा आणि सहकलाकर आपली कला सादर करणार आहेत.