Home ताज्या बातम्या ओबीसींच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास

ओबीसींच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास

0
ओबीसींच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास

ओबीसी मुला-मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन

चंद्रपूर, दि.१८ – आज ओबीसींसाठी वसतिगृह स्थापन होत आहेत. पण पूर्वी ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय नव्हते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझी चर्चा झाली. ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय असायला हवे, यावर शिक्कामोर्तब झाले. फाईल स्वाक्षरीसाठी माझ्याकडे आली तेव्हा मी क्षणाचाही विलंब न करता स्वाक्षरी केली. आणि ९ मार्च २०१७ ला महाराष्ट्रात ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन झाले. ओबीसींच्या कल्याणासाठी मी सदैव कटिबद्ध आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

ओबीसी मुला-मुलींच्या वसतिगृहांचे उद्घाटन  श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. दीड ते दोन वर्षांत अतिशय सुंदर ओबीसी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे वसतिगृह तयार होतील. नाशिकच्या धरतीवर डिझाईन तयार केले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, सहायक आयुक्त आशा कवाडे, अॅड. पुरुषोत्तम सातपुते, राहुल पावडे, अरुण तिखे, विलास माथनकर, प्रा. अनिल डहाके, गोमती पाचभाई, डॉ. मंगेश गुलवाडे, रमेश राजूरकर, संदीप आवारी, पुरुषोत्तम सहारे, सुर्यकांत खनके, उमेश कोराम, सुभाष कासमगोट्टुवार, अजय सरकार, सविता कांबळे, श्रुती गवारे, शिला चव्हाण, शितल गुरनुले, वनिता डुकरे यांची उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणणे, अफजलखानाच्या कबरीचे अतीक्रमण हटवणे किंवा भवानी मातेसाठी रत्नजडीत छत्र उभे करणे असेल, मला ही कामे करता आली, हे माझं भाग्य आहे. रायगडावर आता दरवर्षी राज्य सरकारच्याच वतीने राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतला. औरंगाबादचे नाव बदलण्याची इच्छा वारंवार मांडली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी मान्य करून छत्रपती संभाजीनगर असे नाव केले. त्यात माझाही खारीचा वाटा आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९२० मध्ये लंडन येथे ज्या घरी शिक्षणासाठी मुक्कामाला होते, त्या घराला स्मारक करण्याची संकल्पना पुढे आली. त्या फाईलवर स्वाक्षरी करण्याचे भाग्य देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मलाही लाभले, असे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

चंद्रपूरमध्ये चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात, असा प्रयत्न आहे. मी १६ मार्च १९९५ मध्ये आमदार झाल्याबरोबर पहिली घोषणा वाचनालयाची केली होती. आज चंद्रपूर, मूल, पोंभूर्णा येथील दिड हजार विद्यार्थी वाचनालयाचा लाभ घेत आहेत. स्व. बाबा आमटे यांच्या सेवाकार्याची दखल म्हणून शासनातर्फे डाक तिकीट प्रकाशित केले. पण त्यांच्या स्मृती जपण्यासाठी उत्तम अभ्यासिका आवश्यक आहे असे मला वाटले. आज स्व. बाबा आमटे अभ्यासिका अनेक विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरत आहे. महाराष्ट्राचा आयपीएस-आयएएसचा टक्का वाढला पाहिजे, असे मला सातत्याने वाटायचे. मी याकडे सभागृहात लक्ष वेधले. त्यानंतर ठराव झाला आणि समिती तयार झाली. आता महाराष्ट्राचा टक्का वाढला. ट्रेनिंग सेंटर अत्याधुनिक झाले. अधिकाऱ्यांची संख्या वाढवली, हे सांगतानाच  श्री. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात ३०० ओबीसी विद्यार्थ्यांना आणि ३०० ओबीसी विद्यार्थिनींना आधार योजना देण्याचा निर्णय केल्याची माहितीही दिली.

त्यांना तुरुंगात टाकू

व्यावसायिक शिक्षण घ्यायचे असेल तर ५० टक्के शुल्क सवलत होती. आता ओबीसी मुलींना १०० टक्के शुल्क सवलत केली. इडब्ल्यूएसमध्ये देखील १०० टक्के सवलत केली आहे. काही व्यवस्थापनांनी यात खोडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अशा संस्थांच्या प्रमुखांना तुरुंगात टाकले पाहिजे. कारण ते राज्याच्या योजना बदनाम करत आहेत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

आर्थिक स्थिती बळकट

बहिणींना विश्वासाने सांगितले की, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. राज्याच्या तिजोरीवर या योजनेचा मुळीच भार नाही. मी अर्थमंत्री असताना स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा राज्याचा महसूल ११ हजार ९७५ कोटी रुपयांनी सरप्लस केला होता. आपली आर्थिक स्थिती बळकट आहे. आपण शेवटच्या व्यक्तीच्या प्रगतीसाठी काम करण्याचा उद्देश पुढे ठेवला आहे. कुणीही वंचित राहू नये असा आपला प्रयत्न आहे, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.

चंद्रपूरच्या शैक्षणिक प्रगतीसाठी

चंद्रपूर जिल्हा शिक्षण क्षेत्रात वेगाने पुढे जावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून त्यादृष्टीने पाऊल टाकले आहे. चंद्रपूर इंजिनियरिंग कॉलेजमध्ये रतन टाटांकडून २६३ कोटी रुपये आणले आहेत. अत्याधुनिक सोयी-सुविधा आणि तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत अशी व्यवस्था असेल. एसएनडीटी विद्यापीठ परिसर तयार होत आहे. यात सर्व जातींच्या हजारो मुलींसाठी ६२ अभ्यासक्रम आणले आहेत. चंद्रपूरमधील मुलं देखील व्यावसायिक पायलटचं प्रशिक्षण घेऊ शकतील. मोरवा एअरपोर्टमध्ये फ्लाईंग क्लब लवकरच सुरू होणार आहे. ओबीसी, आदिवासी मुलामुलींना त्याचा लाभ मिळणार आहे, असे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

श्रुती गवारे विध्यार्थिंनीने मानले आभार

श्रुती गव्हारे विध्यार्थिंनीने आपले मनोगत व्यक्त करीत एक सुंदर कविता सादर केली. ओबीसी मुला-मुलींसाठी वसतिगृह सुरु केल्याबद्दल श्री. मुनगंटीवार यांचे कृतज्ञता व्यक्त करीत आभार मानले.