Home बातम्या ऐतिहासिक ओला-कोरडा दुष्काळ सर्वात मोठे कहर सुरू , आव्हान!

ओला-कोरडा दुष्काळ सर्वात मोठे कहर सुरू , आव्हान!

0

औरंगाबाद : थैमान घालणाऱ्या पावसाने यंदा देशभरात हजारापेक्षा जास्त बळी घेतले. हजारो लोकांना बेघर केले. कोट्यवधींचे नुकसान केले. ओल्या दुष्काळाचा हा कहर सुरू असतानाच महाराष्ट्रातीलमराठवाडा, विदर्भासारख्या भागात पाण्यासाठी टँकर मागवावे लागले. वातावरणातील बदलाचा हा धोका भविष्यात टाळायचा असेल तर विविध माध्यमांतून होणारे प्रदूषण टाळायला हवे, असा सल्ला पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे.  

वातावरणातील बदलाचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम तपासण्यासाठी नियामक मंडळ आणि कार्यदलाची स्थापना करण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्राने एक सकारात्मक पाऊल टाकले आहे. या पार्श्वभूमीवर वातावरणातील बदलाचा मानवी आरोग्यावरील परिणामाचा शोध घेतला असता भविष्यकाळ अतिशय कठीण असल्याचे स्पष्ट झाले. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, वातावरणातील बदलाचा आरोग्यावर सर्वाधिक परिणाम लहान मुले आणि गरोदर मातांवर होतो.  इंटरगव्हर्नमेंट ऑफ पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी)च्या अहवालानुसार, १९७९ ते २००४ या काळात जगभरात नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या मृत्यूंपैकी ९५ टक्के मृत्यू हे विकसनशील देशांत झाले. त्यातही भारत आणि चीनचे प्रमाण सर्वाधिक होते. 

नॅशनल हेल्थ पोर्टलनुसार, जगभरात सद्य:स्थितीत दहापैकी चार लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. स्वच्छ पाण्याच्या टंचाईमुळे अतिसाराचा धोका वाढतो. यामुळे दरवर्षी जवळपास २२ लाख लोकांचा मृत्यू होतो. भारताचाच विचार केल्यास अलीकडेच्या काळात मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, हृदयाचे आजार, श्वसनाचे आजार, मूत्रपिंडासंदर्भातील आजारांनी आपला देश त्रस्त आहे. डास, पिसूच्या माध्यमातून हे आजार पसरतात. दिवसेंदिवस या आजारांचा धोका वाढतोच आहे. २०५० पर्यंत १.५ डिग्री सेल्सिअस तापमानवाढ झाल्यास जवळपास ३५० दशलक्ष लोकांना प्राणघातक उष्णतेचा त्रास होऊ शकतो, असा इशारा नॅशनल हेल्थ पोर्टलने दिला आहे. 

२२.५ दशलक्ष लोकांना दरवर्षी जगभरात वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या आजारांना सामोरे जावे लागते. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, दरवर्षी ही संख्या वाढतच जाणार आहे. 

२,५०,००० वाढीव मृत्यू वातावरणातील बदलामुळे भारतात दरवर्षी २०३० ते २०५० या कालखंडात होतील. याची कारणे कुपोषण, मलेरिया, अतिसार आणि अति उष्णता असतील. 

७० लाख मृत्यू दरवर्षी जगभरात हवामान बदलासाठी जबाबदार असलेल्या वायू प्रदूषणातून होतात. 

२२.५  दशलक्ष लोक दरवर्षी जगभरात नैसर्गिक आपत्तीमुळे स्थलांतरित होतात. भविष्यात ही आकडेवारी आणखी वाढण्याचा धोका आहे.

हवेतील प्रदूषण कमी करणे हाच उपाय

वातावरण बदलाचा मानवी आरोग्यावरील परिणाम दिवसेंदिवस वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. कुपोषण, दरवर्षी समोर येणारे अपरिचित आजार, टोकाची थंडी वा उष्णता हा वातावरण बदलाचाच परिणाम आहे. हवेतील प्रदूषण कमी केले तर आमच्या फुफ्फुसावर त्याचा सकारात्मक परिणाम लगेच जाणवतो. यामुळे वातावरण बदलाचा धोका टाळण्यासदेखील मदत होते. 

– उष्माघात

– उष्णतेचा ताण

– अतिसार

– मूत्रपिंडाचे आजार

– मज्जासंस्थेच्या कामाची गती कमी होणे

– श्वसन, दमा, ह्वदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार