‘ओ नाखवा, बोटीनं फिरवाल का?’; पोलिस वसाहतीमधील पाण्याचा व्हिडीओ व्हायरल

‘ओ नाखवा, बोटीनं फिरवाल का?’; पोलिस वसाहतीमधील पाण्याचा व्हिडीओ व्हायरल
- Advertisement -

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत पाणी साचणार नाही, असे कितीही दावे केले जात असले तरी ते दरवर्षी फोल ठरतात. मुंबई पालिका प्रशासनावर राजकीय पक्षच नव्हे तर सर्वसामान्य मुंबईकरही वेगवेळ्या पद्धतीने आपला राग काढत असतात. पंतनगरमधील एका पोलिसाच्या मुलांनी घरात साचलेल्या पाण्यात बेडवर बसून जणू काही बोटीत असल्याचे भासवत टओ नाखवा, बोटीनं फिरवाल का?’ या गाण्यावर ताल धरला आहे. ही प्रशासनाला अनोख्या पद्धतीने दिलेली चपराक असून, हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्ये शनिवारी रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. या पावसाने मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचले आणि तळमजल्यावरील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. घाटकोपर पंतनगरमधील पोलिस वसाहतीमध्येही पाणीच पाणी होते. या वसाहतीमध्ये तळमजल्यावर राहणाऱ्या अनेकांनी शनिवारची रात जागून काढली. तळमजल्यांवरील घरांमध्ये गुडघ्याच्या वर पाणी भरले होते. इमारत क्रमांक ६४मध्ये राहणाऱ्या कॉन्स्टेबल शेलार यांच्या घरामध्येही त्या रात्री पाणी होते. आपण कशाप्रकारे पाण्यात जागून रात्र काढत आहोत, हे दाखवण्यासाठी शेलार यांच्या मुलांनी एक व्हिडीओ तयार केला. यामध्ये वडिलांच्या ड्युटीवरील काठीचा वापर वल्ली म्हणून तर बेड बोट म्हणून भासवण्यात आला आहे. ‘ओ नाखवा, बोटीनं फिरवाल का?’ या गाण्यावर ताल धरत जणू काही हे दोघे पाण्यातून वाट काढत आहेत, असेच यातून दिसते आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पंतनगर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी या वसाहतीला भेट दिली. यावेळई घर बदलून घेण्याची विनंती शेलार कुटुंबीयांनी केली. शिवाय हा व्हिडीओ सहजच केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

Source link

- Advertisement -