औद्योगिक क्षेत्रातील जागतिक बाजारपेठ संपादित करण्यास भारत सज्ज – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

औद्योगिक क्षेत्रातील जागतिक बाजारपेठ संपादित करण्यास भारत सज्ज – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे
- Advertisement -

मुंबई, दि. 17 :- भारत औद्योगिकरणामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती करत असून सुरक्षेला प्रथम  प्राधान्य देण्यात येत आहे. अग्नी सुरक्षेत मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक तंत्रज्ञान येत आहे. भारत अशा प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यास नेहमीच अग्रगण्य राहिलेला आहे. भारत औद्योगिक क्षेत्रांमध्ये ग्लोबल प्लेयर बनला असून जागतिक बाजारपेठ संपादित करण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

दुबई स्थित मे. फ्रँकफोर्ट यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे “इंटरसेक एक्झिबिशन-२०२४” चे आयोजन केले होते. फायर प्रोटेक्शन असोशिएन ऑफ इंडिया आणि सेफ्टी अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरिंग असोशिएशन यांनी प्रदर्शनात असणाऱ्या राज्याच्या आणि भारताच्या विविध दालनांचे उद्घाटन मंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या प्रदर्शनामध्ये फायर सेफ्टी व सेक्युरिटी यांचेशी निगडित असणारे सुमारे एक हजार कंपनीच्या उत्पादनांचे स्टॉल्स आहेत. यामध्ये भारतातून आणि विशेषत: महाराष्ट्रातून सुमारे १०० पेक्षा जास्त उद्योजकांचे स्टॉल्स आहेत.

यावेळी मंत्री डॉ. खाडे म्हणाले, या प्रदर्शनात मी भारताचा व  महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून सहभागी झालो आहे. महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून जागतिक व्यापारासाठी आपल्या सर्वांसाठी खंबीरपणे उभा आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे. फायर सिक्युरिटी आणि सेफ्टीला प्राधान्य देत असून आंतरराष्ट्रीय व्यापार आणि करारासाठी  तयार आहोत. महाराष्ट्रातील, भारतातील कोणत्याही उद्योजकांना या ठिकाणी कोणतीही मदत लागल्यास संपर्क साधावा.

यावेळी मंत्री श्री. खाडे आणि कामगार विभागाच्या प्रधान सचिव  विनीता वेद सिंगल यांनी स्टॉल धारकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.

उद्घाटन सोहळ्यास भारताच्या वाणिज्य दूतावासचे  के. कालिमुथु, दुबई हेड फ्रँकफोर्टचे आयोजक प्रतिनिधी श्रीमती सोमय्या, प्रसार भारतीचे सह संचालक विनोदकुमार, राज्याचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक  देविदास गोरे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कुंभार, महाराष्ट्र फायर सेफ्टीचे श्री. वारीक, फायर प्रोटेक्शन असोसिएशन ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

००००

मनीषा सावळे/विसंअ/

- Advertisement -