Home शहरे औरंगाबाद औरंगाबादच्या राजकीय खेळात ध्रुवीकरणाचा दुसरा अंक

औरंगाबादच्या राजकीय खेळात ध्रुवीकरणाचा दुसरा अंक

औरंगाबाद :प्रतिनिधी

‘तुम्ही कद्रू तर आम्ही संकुचित’ असा औरंगाबादच्या राजकीय पटलावरील खेळ राजकीय धार्मिक ध्रुवीकरणाचा दुसरा अंक असल्याचे मानले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीसह सर्व खासदाराचे अभिनंदन केल्याचा ठराव मंजूर केल्यानंतर पुन्हा स्वतंत्रपणे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांचे अभिनंदन करण्याचा ठराव घ्यावा, असा हट्ट ‘एमआयएम’च्या नगरसेवकांनी धरला आणि औरंगाबाद महापालिकेत गदारोळ झाला. त्यानंतर महापौरांनी २० नगरसेवकांना निलंबित केले. तत्पूर्वी शहरातील सिद्धार्थ उद्यानातील बछडय़ांच्या नामकरण सोहळ्यात खासदार इम्तियाज जलील यांना आमंत्रित करायचे नाही असे ठरवून शिवसेनेने रणनीती आखली होती. शिवसेना संकुचित विचार करीत असल्याचा आरोप ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. तर अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास विरोध करणे हा ‘एमआयएम’ केलेला कद्रूपणा होता. हे सारे कशासाठी? विधानसभा निवडणुकीमध्ये विभागलेले मतदार एकगठ्ठा राहावेत, यासाठी शिवसेना कुरघोडी करत आहे. ‘एमआयएम’च्या उमेदवाराने खासदार व्हावे ही कृती शिवसेनेच्या पचनी पडलेली नाही. त्यामुळे हे सारे घडत असल्याचे सांगण्यात येते.

वास्तविक या घडामोडींमागे लोकसभा निवडणुकीतील आकडय़ांची बेरीज- वजाबाकी कारणीभूत आहे. औरंगाबादमध्ये मतांच्या विभागणीमुळे इम्तियाज जलील आमदार झाले होते. त्यांच्या मतदारसंघात लोकसभेतील मतदानाचा कल शिवसेना आणि भाजपला चिंतेत टाकणारा आहे. या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीमध्ये ९९ हजार ४५० मते इम्तियाज जलील यांना मिळाली. विशेष म्हणजे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खरे आणि ज्यांच्यामुळे मते विभागली गेली त्या हर्षवर्धन जाधव यांना अनुक्रमे ५०९२७ आणि ३०२१० एवढी मते मिळाली होती. या दोघांच्याही मतांची बेरीज केली तरी औरंगाबाद ‘मध्य’ विधानसभा मतदारसंघातून ‘एमआयएम’ आघाडीवर राहील असे चित्र आहे. या मतदारसंघात इम्तियाज जलील यांना ४८ हजार ५२३ मतांची आघाडी मिळाली होती.

औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदानाची आकडेवारीही अशीच सेनेला चिंतेत टाकणारी आहे. या मतदारसंघात चंद्रकांत खरे यांना ५५,४१७ मते मिळाली होती, तर जलील यांना ९२ हजार ३४७. या मतदारसंघातही खरे आणि हर्षवर्धन जाधव यांना मिळालेल्या मतांची बेरीज केली तरी ११ हजार ३११ मते कमी पडली. त्यामुळे मतांची विभागणी थांबल्याशिवाय विजय अवघड असल्याची जाणीव भाजप-सेनेच्या नेत्यांना झाली आहे. दलित समाजाने ‘एमआयएम’ला केलेले मतदान यामुळे सेना-भाजपचे नेते एका अर्थाने बावरले आहेत. त्यामुळे निवडून आलेल्या नेत्यांना बाजूला ठेवून कारभार हाकता येतो, हे त्यांना दाखवून द्यायचे आहे.

‘एमआयएम’ हा मुळातच आक्रमक पक्ष आहे. त्यात कोणताही एक नगरसेवक तिरसटासारखी भूमिका मांडतो. त्यावरून गोंधळ होतो. तो होऊ दिला जातो आणि त्यानंतर इम्तियाज जलील सर्वसमावेशक भूमिका मांडतात, असे दिसून आले आहे. वंदे मातरम् म्हणण्यावरून असेल किंवा अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणे असेल ‘एमआयएम’ सारे काही एकगठ्ठा मतांसाठी करीत आला आहे.

सारे काही एकगठ्ठा मतांसाठी!

औरंगाबाद महापालिकेत राजदंड पळविण्याचा प्रकार, सभागृतील गोंधळ हा ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा दुसरा अंक आहे. यात दोन्ही पक्ष संकुचित आणि कद्रूपणाला चिकटून असल्याचे पाहावयास मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहरात मतांच्या ध्रुवीकरणासाठी राजकीय पक्ष कुरघोडीचे प्रयत्न करीत आहेत. औरंगाबादमध्ये ‘एमआयएम’ला मिळालेला विजय हा शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. त्याचे उट्टे विधानसभा निवडणुकीत काढण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे, असे सांगण्यात येते.