Home ताज्या बातम्या कंगनाला पासपोर्टविषयी दिलासा मिळण्याची शक्यता

कंगनाला पासपोर्टविषयी दिलासा मिळण्याची शक्यता

0
कंगनाला पासपोर्टविषयी दिलासा मिळण्याची शक्यता

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
दोन एफआयआरमुळे माझ्या पासपोर्टच्या नूतनीकरणात अडचणी निर्माण झाल्या आहेत, असे गाऱ्हाणे मांडत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणारी अभिनेत्री कंगना रणोटला लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. दोन एफआयआर नोंदवलेले असले तरी त्या अनुषंगाने न्यायालयात माझ्याविरुद्ध कोणताही खटला सध्या प्रलंबित नसल्याचे कंगनातर्फे सोमवारी उच्च न्यायालयात सांगण्यात आले. त्यानंतर तिच्या अर्जाचा लवकरात लवकर विचार करण्याची ग्वाही प्राधिकरणाने दिली.

‘चित्रपटांचे चित्रीकरण व अन्य व्यावसायिक कामांसाठी मला वारंवार परदेशात जावे लागते. माझ्या पासपोर्टची मुदत सप्टेंबर-२०२१मध्ये संपत असल्याने त्याच्या नूतनीकरणासाठी मी अर्ज केला असता, पासपोर्ट प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी माझ्याविरुद्धच्या दोन एफआयआरच्या कारणांमुळे त्यास असमर्थता दर्शवली. परिणामी माझ्यासह चित्रपट निर्मात्यांचेही नुकसान होत आहे’, असे निदर्शनास आणत कंगनाने अॅड. रिझवान सिद्दिकी यांच्यामार्फत अर्ज केला होता. याविषयी तातडीच्या सुनावणीची आवश्यकता असल्याचा अर्ज कंगनाने मुख्य न्यायमूर्तींना दिल्यानंतर न्या. संभाजी शिंदे व न्या. रेवती मोहिते डेरे यांचे खंडपीठ स्थापन करण्यात आले होते. त्यानुसार, सोमवारी या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

‘कंगनाने तिच्या अर्जात वस्तुस्थिती व्यवस्थित मांडलेली नाही. तिच्याविरोधात सध्या दोन एफआयआर नोंद असले तरी गुन्हेगारी खटले प्रलंबित नाहीत. मात्र दोन खटले प्रलंबित असल्याचे तिने अर्जात म्हटले. त्यामुळे त्या अर्जात तिच्याकडून दुरुस्ती करण्यात येणार असेल आणि खटले प्रलंबित नसल्याचे म्हणणे तिच्यातर्फे न्यायालयात मांडण्यात येणार असेल तर आम्ही तिच्या अर्जाविषयी पासपोर्ट कायद्यातील तरतुदींप्रमाणे लवकरात लवकर विचार करून निर्णय देऊ’, असे म्हणणे पासपोर्ट प्राधिकरणाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी मांडले. तेव्हा कंगनाच्या सूचनेवरून अॅड. सिद्दीकी यांनी तसे निवेदन न्यायालयात केले. त्यानंतर खंडपीठाने ते निवेदन तसेच, पासपोर्ट प्राधिकरणाची ग्वाही नोंदीवर घेऊन कंगनाचा अर्ज निकाली काढला.

देशद्रोहाच्या कलमाखाली एफआयआर

ट्विटर व सोशल मीडियावरील कथित आक्षेपार्ह व सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांबद्दल वांद्रे न्यायालयाने चौकशीचा आदेश दिल्यानंतर पोलिसांनी कंगनाविरोधात गेल्या वर्षी १७ ऑक्टोबर रोजी देशद्रोहाच्या कलमासह अन्य कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे. तर, काश्मीरमधील राणी डिड्डाच्या ऐतिहासिक चरित्राविषयी कथा लिहिणारे लेखक आशीष कौल यांच्या तक्रारीवरून न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे पोलिसांनी कंगनासह अन्य काहींविरोधात स्वामित्व हक्क कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

Source link