Home ताज्या बातम्या कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार रेटींग संपादन करणारी नवी मुंबई राज्यातील एकमेव महानगरपालिका

कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार रेटींग संपादन करणारी नवी मुंबई राज्यातील एकमेव महानगरपालिका

0

 स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्रीय स्वच्छता निरीक्षक पथकाने स्टार रेटींगच्या निकषान्वये केलेल्या सर्वेक्षणानुसार नवी मुंबई महानगरपालिकेस कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार रेटींग प्राप्त करणारी नवी मुंबई ही महाराष्ट्र राज्यातील एकमेव महानगरपालिका आहे. या मानांकनाबद्दल महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी सर्व नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे. 

      स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये नवी मुंबई महानगरपालिका थ्री स्टार रेटींगची मानकरी ठरली होती. त्याचप्रमाणे स्वच्छतेमध्ये राज्यात सर्वप्रथम व देशात सातव्या क्रमांकाच्या शहराचे मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झाले होते. यावर्षी महानगरपालिकेने फाईव्ह स्टार रेटींगसाठी नामनिर्देशन दाखल केले होते. त्या अनुषंगाने केंद्रसरकारमार्फत नियुक्त त्रयस्थ संस्थेच्या निरीक्षक पथकाने कागदपत्रे व प्रत्यक्ष तपासणी करून जाहीर केलेल्या निकालात नवी मुंबई महानगरपालिकेस फाईव्ह स्टार रेटींग जाहीर केले आहे. अशाप्रकारे फाईव्ह स्टार रेटींग प्राप्त करणारे नवी मुंबई हे राज्यातील एकमेव शहर आहे.

      सप्टेंबर 2019 मध्ये केंद्रीय निरीक्षक पथकाने विविध स्थळांची अचानक भेट देऊन स्वच्छता पाहणी केली तसेच विविध ठिकाणच्या कचरा वर्गीकरणाच्या स्थितीचीही पुर्व सूचना न देता पाहणी केली. त्यासोबतच कच-याचे संकलन व वाहतूक पध्दती तसेच कच-याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रीया या संपूर्ण कार्यवाहीची बारकाईने पाहणी केली तसेच कुठल्याही क्षेत्रातील नागरिकांशी ऐनवेळी संवाद साधून त्यांचे अभिप्रायही जाणून घेतले आणि गुणांकन केले. देशातील विविध शहरांच्या पाहणीअंती त्यांनी कचरामुक्त शहरांचे स्टार रेटींग जाहीर केले असून नवी मुंबई महानगरपालिकेस कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार रेटींग प्राप्त झाले आहे व फाईव्ह स्टार रेटींग मिळविणारी नवी मुंबई ही राज्यातील एकमेव महानगरपालिका आहे.

      नवी मुंबईला मिळालेल्या या कचरामुक्त शहराच्या फाईव्ह स्टार रेटींगमध्ये सफाई कामगारांपासून ते नवी मुंबईतील जागरूक व स्वच्छताप्रेमी अशा प्रत्येक नागरिकाचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगत महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी सर्व नागरिकांचे अभिनंदन करत या फाईव्ह स्टार रेटींगचे श्रेय नवी मुंबईतील नागरिकांना दिले आहे.

      नवी मुंबई हे फार मोठ्या क्षमता असणारे शहर असून शहराने सतत आपले मानांकन उंचावत नेले आहे. त्यामुळे फाईव्ह स्टार रेटींगवर समाधानी न राहता आपण सर्वोत्तम अशा सेव्हन स्टार रेटींगसाठी प्रयत्न करायला हवेत असे मत आयुक्तांनी व्यक्त केले आहे. तथापी सेव्हन स्टार रेटींगसाठी मानांकन उंचाविणे हे जनसहभागाशिवाय शक्य नसून यामध्ये नागरिकांनी पुढाकार घेतला तर मात्र काहीच अशक्य नाही. त्यामुळे स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन नवी मुंबई शहराच्या स्वच्छ व आरोग्यशील भविष्यासाठी नागरिकांनी सेव्हन स्टार रेटींगच्या दृष्टीने वाटचाल करीत स्वच्छता कार्यात अधिक जोमाने सक्रीय सहभाग द्यावा व कमीत कमी कचरा निर्माण करून तसेच कच-याची आपल्या पातळीवरच योग्य विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकार घेऊन जागरूकतेने काम करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.