राज्यात वाढत्या करोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी राज्य सरकारने १४ एप्रिलपासून राज्यात लॉकडाउन लागू केला. या दरम्यान अत्यावश्यक सेवा आणि भाजीपाला, जीवनाश्यक वस्तू व फळविक्री सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे हापूस आंबा विक्रीची वेळ वाढविण्यास सरकारने उशीर केल्यास, कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात सापडेल, अशी भावना आंबा विक्रेते अशोक हांडे व इतर व्यापाऱ्यांनी केली. कोकणातील हापूस आंबा एप्रिल व मे महिन्यांत नवी मुंबईतील एपीएमसीच्या फळ बाजारात विक्रीसाठी येतो. हापूसची आवक मार्च, एप्रिल महिन्यात सुरू झाल्यानंतर सुरुवातीला एका चार डझन पेटीच्या दरात एक हजार रुपयांची घट झाली आहे. शेतकऱ्यांचा आंबा बाजारात विक्रीसाठी आल्यानंतर त्यांचे ग्रेडिंग व विभागणी व्यापारी करत असतात. आंबा पिकल्यावर त्याची स्थानिक पातळीवर विक्री करण्यात येते. यात किरकोळ विक्रेत्यांचा समावेश असतो. परिणामी, सकाळी ७ ते ११ या वेळेत व्यापाऱ्यांना आंबाविक्री करणे शक्य होत नाही. तसेच, किरकोळ विक्रीसाठी आंबा खरेदी करणाऱ्या विक्रेत्यांकडून आंब्याची विक्री होत नसल्याने त्याचा परिणामदेखील हापूस आंब्याच्या विक्रीवर झाला आहे. आंब्याची चढ-उतार करणारे कामगार, माथाडी यांना रेल्वेप्रवास बंदी असल्याने त्याचा फटकाही बसला आहे. राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’दरम्यान अन्य फळांच्या विक्रीस संध्याकाळी ५ वाजेपर्यंत परवानगी दिली. त्याच धर्तीवर हापूस विक्री करण्यास वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याचे हापूस आंब्याचे व्यापारी अशोक हांडे यांनी सांगितले.
यंदाही आर्थिक संकट
गेल्या वर्षी केंद्र सरकारने एप्रिल ते मे दरम्यान, लॉकडाउन लागू केला होता. त्यामुळे, हापूस आंब्याच्या निर्यातीवर परिणाम झाल्याने कोकणातील हापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. चालू हंगामातदेखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. हापूस आंबाविक्रीची वेळ वाढविण्यास सरकारने उशीर केल्यास, कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात सापडेल, अशी भावना आंबा विक्रेते, व्यापारी करीत आहेत.