
मुंबई, दि. 20 : महाराष्ट्र आणि गोवा जवळ असलेल्या अरबी समुद्रावर 21 मे रोजी एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज आहे आणि 24 मे पर्यंत हा कमी दाबाचा पट्टा अजून तीव्र होऊन उत्तरेकडे सरकण्याची शक्यता सध्या नाकारता येत नाही. या दरम्यान हा कमी दाबाचा पट्टा राज्याच्या किनारपट्टीपासून एका सुरक्षित अंतरावर राहणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे राज्याला त्याचा थेट धोका नसणार आहे. मात्र त्याच्या प्रभावामुळे 21 ते 24 मे दरम्यान राज्याजवळील असलेला अरबी समुद्र काही प्रमाणात खवळलेला पाहिला मिळू शकतो, तर पश्चिम किनारपट्टीवर 22 ते 24 दरम्यान पावसासह वाऱ्याचा वेग काही प्रमाणात वाढू शकतो.
मासेमाऱ्यांनी कोणती सावधगिरी बाळगावी?
21 आणि 22 मे रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या जवळ असलेला समुद्र काही प्रमाणात खवळलेला पाहिला मिळू शकतो, तर खोल समुद्र जोरदार वाऱ्यामुळे अधिक प्रमाणात खवळलेला राहील.
22 ते 24 दरम्यान रत्नागिरी, मुंबई, आणि पालघर जवळ असलेला समुद्र काही प्रमाणात खवळलेला पाहिला मिळू शकतो, तर खोल समुद्र जोरदार वाऱ्यामुळे अधिक प्रमाणात खवळलेला राहील.
मासेमारांनी हवामानाच्या स्थितीकडे लक्ष ठेवावे, आणि स्वतःच्या सुरक्षितेसाठी 21 ते 24 मे दरम्यान अरबी समुद्रातील खोल भागांमध्ये जाणे टाळावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे.
000