हिंगोली (जिमाका), दि. 08 : जिल्ह्यात पीक कर्जाचे वाटप अत्यंत कमी म्हणजे 39 टक्के आहे. त्यामुळे ज्या बँकाचे पीक कर्ज वितरण कमी आहे, अशा बँकाची माहिती द्यावी. या बँकाची राज्यस्तरावर बैठक घेऊन पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत त्यांना सूचना देण्यात येतील, असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव नितीन गद्रे यांनी आज दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आज राज्याचे अपर मुख्य सचिव (सेवा) तथा हिंगोली जिल्ह्याचे पालक सचिव नितीन गद्रे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी श्री. गद्रे बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालक सचिव श्री. नितीन गद्रे म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेच्या कामाला सध्या स्थगिती देण्यात आली आहे. यातील काही महत्वाची कामे यापूर्वीच चालू असतील तर त्या कामावरील मजुरांची मजूरी व अन्य बाबींच्या खर्चाबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करावा. त्याबाबतचा आढावा घेऊन शासनाकडून मान्यता घेण्यात येईल. तसेच नवीन योजनांना लेखाशीर्ष उपलब्ध करुन देण्यासाठी आणि मदत व पुनर्वसन विभागासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. तसेच औंढा नागनाथ व इतर पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगितले.
जिल्ह्यातील पर्जन्यमान, आपत्ती व्यवस्थापन, लघु व मध्यम प्रकल्पातील पाणी साठा, अतिवृष्टी, शेतकरी आत्महत्या, खताची मागणी व पुरवठा, नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना, शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप, पर्यटन स्थळाचा विकास, जलजीवन मिशनची कामे, आरोग्य विभाग, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला.
या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी विविध विभागातील कामाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
******