कमी वेळेत लसीकरण

कमी वेळेत लसीकरण
- Advertisement -


म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना झालेल्या लसीकरणाच्या टप्प्यात प्रत्येक लस टोचण्यासाठी लागणारा कालावधी हा सहा ते सात मिनिटांचा होता. नोंदणी व केंद्रनिहाय निवड पद्धतीमुळे हा कालावधी निम्म्याने कमी झाला आहे. लशींची जर योग्य प्रमाणामध्ये उपलब्धता झाली तर प्रत्येक प्रभागामध्ये लसीकरणाचे केंद्र उपलब्ध करून दिल्यास ही प्रक्रिया सुरळीत पार पडू शकेल, याकडे वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे.

नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, शनिवारी ही प्रक्रिया सुरळीत पार पडली. ज्यांनी वेळ व केंद्रांची निवड केली नव्हती, अशा अनेक व्यक्ती लस घेण्यासाठी आल्या होत्या. मात्र त्यांना ही सुविधा देण्यात आली नाही. या पद्धतीमुळे लसीकरणासाठी लागणारा कालावधी कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. निरीक्षणासाठी लागणारा अर्ध्या तासाचा वेळ मात्र कायम राहिला.

सेव्हन हिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी दोनशे जणांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते, त्यानुसार ते पूर्ण झाले. गर्दी टाळण्यासाठी हा पर्याय योग्य असल्याचा सूर व्यक्त होत होता. वॉर्डनिहाय लोकसंख्येनुसार लसीकरणाचा कार्यक्रम राबवल्यानंतर ज्यांना अॅपच्या माध्यमातून नोंदणी करता आली नाही त्यांच्यासाठी विशेष सुविधा देता येईल. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने लसीकरणाच्या पहिल्या डोसनंतर ही मोहीम राबवता येईल, याकडे सुविधा आरोग्य संस्थेच्या प्रकाश पवार यांनी लक्ष वेधले.

वॉक-इन पद्धतीमध्ये अनेक केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा पर्याय उपयुक्त असला तरीही जोपर्यंत लसींची संख्या वाढत नाही तोपर्यंत मोठ्या लोकसंख्येमध्ये यशस्वीपणे हा पर्याय राबवणे शक्य होणार नाही, असेही मत लसीकरण कार्यक्रमात सहभागी असलेल्या डॉक्टरांनी व्यक्त केले.

कोव्हॅक्सिन उपलब्ध नाही

कोव्हॅक्सिन लशीची उपलब्धता सध्या नसल्यामुळे १८ ते ४४ या गटामध्ये कोव्हिशिल्ड लस देण्यात येणार आहे. राज्यात सर्वच ठिकाणी या लशीची उपलब्धता कमी आहे, त्यामुळे सध्या या गटामध्ये लसीकरणासाठी कोव्हॅक्सिनचा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. कूपर रुग्णालयामध्ये १९१ जणांना लस देण्यात आली तर बीकेसीमध्ये २००पैकी १९६ सेव्हन हिल्समध्ये १९३ तर नायर रुग्णालयामध्ये १८२ जणांना लस देण्यात आली.

दुसरा डोस नाही

अनेक ज्येष्ठ नागरिकांचा लसीकरणासाठी पहिला डोस घेऊन झालेला आहे, त्यांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. मात्र अनेक केंद्रांवर शनिवारी दुसरा डोस देण्यात आला नाही. तसेच आरोग्य कर्मचारी वा ज्येष्ठ नागरिकांमध्ये पहिला डोसही देण्यात आलेला नाही. त्यामुळे हे लसीकरण केव्हा होणार असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. आज, रविवारीही या केंद्रांवर १८ ते ४४ या गटासाठी नोंदणीकृत व्यक्तींसाठी लसीकरण होणार आहे. तूर्तास तीन ते चार दिवसांची उपलब्धता असली तरीही लसींचे अधिक डोस येण्याची शक्यता आहे.



Source link

- Advertisement -