हायलाइट्स:
- अभिनेता करण मेहराच्या अडचणींमध्ये वाढ
- निशा रावलने करणवर केले घरगुती हिंसाचाराचे आरोप
- ]करणसह त्याच्या घरच्यांविरोधातही निशाने दाखल केली आहे तक्रार”
जर करणच्या विरोधात पोलिसांना काही पुरावे मिळाले तर त्याला अटक होण्याची शक्यता आहे. निशाने ३१ मे रोजी करणच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार देखील होती. त्यावर पोलिसांनी प्राथमिक तपास पूर्ण झाल्यानंतर २५ जून रोजी तक्रार दाखल करून घेतली आहे. आतापर्यंत कुणालाही अटक झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, निशाने करणच्या आणि त्याच्या घरच्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या सगळ्यांना आरोपी केले आहे. निशा रावलने ३१ मे रोजी पोलिसांकडे घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. तिने नवऱ्याने मारहाण केल्याचा आरोप केला होता. या मारहाणीमुळे निशाच्या कपाळावर जखमही झाली होती. तेव्हा पोलिसांनी करणला अटक केली होती, परंतु त्यानंतर करणची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
करणच्या कुटुंबावरदेखील आरोप
निशाने केलेल्या तक्रारीनुसार गोरेगाव पोलिसांनी करण आणि त्याच्या कुटुंबाविरोधात एफआयर दाखल करून घेतला आहे. पोलिसांच्या एफआयरमध्ये करणने निशाला अनेकदा मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. केवळ इतकेच नाही तर करणच्या कुटुंबातील अजय मेहरा, बेला मेहरा आणि कुणाल मेहरा यांनी देखील मारहाण केल्याचा आणि छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. करणने परवानगी न घेता बँक खात्यामधून १ कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढल्याचा आरोपही निशाने केला आहे.
डिप्रेशन आल्यानेच निशाने केलेत आरोप
३१ मे रोजी निशा रावल गोरेगाव पोलीस ठाण्यात गेली होती. त्यावेळी तिच्या कपाळावर झालेल्या जखमेतून रक्त वाहत होते आणि तशा अवस्थेत ती पोलीस ठाण्यात गेलेली. त्यानंतर निशाने मीडियाशी संवाद साधला. यावेळी निशाने करणचे दिल्लीमधील एक मुलीशी अफेअर असल्याचा आरोप केला. तसेच घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून स्वतःचा बचाव करत करण आपल्याला सातत्याने मारहाण करत असल्याचा आरोपही निशाने यावेळी केला होता. तर दुसरीकडे निशाने जे काही आरोप केले आहेत, ते सर्व डिप्रेशनमधून केले आहेत, असे करणने सांगितले. तसेच हे सर्व कारस्थान ती तिचा भाऊ रोहित सेठिया याच्या मदतीने रचत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता.
करणच्या अफेअरबद्दल सासू- साऱ्यांनाही सांगितले होते
निशाने तिच्या जबाबामध्ये सांगितले आहे की, अनेक दिवसांपासून या दोघांमध्ये तणाव आहे. करणच्या अफेअरची माहिती सासू- सासऱ्यांनाही दिली होती. परंतु त्यांनी यावर काहीही कारवाई केली नाही. निशाने तिच्या जबाबात पुढे असेही नमूद केले की, ती आणि करण सहमतीने घटस्फोट घेण्यावरही विचार करत होते. परंतु एकेदिवशी करणने तिला खूप मारहाण केली आणि यापुढे हे सगळे सहन करणे अशक्य झाले. करणवर खूप कर्ज होते. हे सर्व कर्ज माझे दागिने विकून फेडल्याचेही निशाने तिच्या जबाबामध्ये सांगितले आहे.
करणने सर्व आरोप फेटाळले
तर दुसरीकडे, करण मेहराने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. लग्नाला नऊ वर्ष झाल्यानंतर या दोघांमध्ये तणाव आल्याने वाईट वाटत असल्याचे त्याने नमूद केले. तसेच निशाने केलेले सर्व आरोप त्याने फेटाळले असून ती खोट बोलत असल्याचे सांगितले आहे. त्याने निशाला कधीही मारहाण केली नाही. तसेच तिच्याकडून कधीच पैसे देखील घेतलेले नाहीत असे म्हटले.