करोनाचा धोका आहे, चौकशीला हजर राहू शकत नाही; देशमुखांचं ईडीला उत्तर

करोनाचा धोका आहे, चौकशीला हजर राहू शकत नाही; देशमुखांचं ईडीला उत्तर
- Advertisement -

हायलाइट्स:

  • अनिल देशमुख यांना ईडीचं दुसऱ्यांदा समन्स
  • प्रत्यक्ष चौकशीस हजर राहण्यास अनिल देशमुख यांचा नकार
  • वय, आजार आणि करोनाचं दिलं कारण

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सक्तवसुली संचानलायाच्या (ईडी) अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास असमर्थता दर्शवली आहे. वय, आजारपण आणि करोनाच्या धोक्याचं कारण देशमुख यांनी त्यासाठी दिलं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माझी चौकशी करावी, असं देशमुख यांनी म्हटलं आहे. (Anil Deshmukh Refuses To Appear Before Ed)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर देशमुख यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. आतापर्यंत दोन वेळा ईडीनं देशमुख यांच्या घरी छापे टाकून कागदपत्रांची तपासणी केली आहे. दुसरा छापा मागील आठवड्यात टाकण्यात आला होता. त्यानंतर देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना अटकही करण्यात आली. त्यांच्या चौकशीनंतर काही महत्त्वाची माहिती ईडीच्या हाती आली आहे. त्या आधारे ईडीनं आतापर्यंत अनिल देशमुख यांना चौकशीसाठी दोन वेळा समन्स बजावलं आहे. पहिल्या समन्सच्या वेळी देशमुख यांनी वकिलांना पाठवून मुदत मागून घेतली. त्यानंतर ईडीनं दुसरं समन्स बजावत देशमुख यांना (२९ जून) आज चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून देशमुख यांनी प्रत्यक्ष चौकशीसाठी हजर राहता येणार नसल्याचं म्हटलं आहे.

वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळीच पोहोचले रुग्णालयात; तासाभरानंतर पुन्हा घरी

‘आजही मी स्वत: चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. माझं वय ७२ वर्षे आहे. आजारपण आणि करोना होण्याच्या धोक्यामुळे मी हजेरी लावू शकत नाही. त्याऐवजी माझा जबाब ऑनलाइन घ्यावा. ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्यास मी कधीही तयार आहे. मात्र, त्याआधी ईडीनं ईसीआर (Enforcement Case Information Report) पाठवावा,’ अशी विनंती देशमुख यांनी केली आहे. माझ्या वतीनं ईडीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी अधिकृत प्रतिनिधी नेमला आहे,’ असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. ‘माझ्याविरुद्ध करण्यात आलेले आरोप खोटे आणि निराधार आहेत,’ याचा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे.

वाचा: इस्रायली दूतावासाचं मराठीत ट्वीट; ‘या’ कामाबद्दल केलं मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन

Source link

- Advertisement -