देशभरात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असतानाच मुंबईत मात्र रुग्णांची संख्या नियंत्रणात येत आहे. याचे श्रेय आरोग्य यंत्रणेबरोबर मुंबई पोलिसांनादेखील जाते. दुसऱ्या लाटेत लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी मुंबई पोलिसांनी स्वतःला झोकून दिले आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठीच्या निर्बंधांमध्ये मुंबई पोलिसांनी नियम मोडणाऱ्या ७,३२२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. परवानगी असलेली दुकाने सुरू ठेवणे, वेळेतच दुकाने बंद करणे, गर्दी होऊ न देणे, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई यामुळेच करोनाची विषाणूची मुंबईतील साखळी तुटत आहे.
करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने १५ मे पर्यंत निर्बंध जाहीर केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणासही घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. इतकेच नाही तर दुकानेही ठरावीक वेळेतच उघडण्याची परवानगी देण्यात आली. हे नियम शासनाने लागू केले असले तरी त्याचे नीट पालन केले जाते की नाही हे पाहण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. पहिल्या लाटेप्रमाणेच पोलिसांनी आत्ताही अहोरात्र काम सुरू ठेवले असून ५ एप्रिलपासून आत्तापर्यंत ७,३२२ जणांवर नियम मोडल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. या कालावधीत विनाकारण फिरणाऱ्यांवर सर्वाधिक २,२९३ तर परवानगी नसताना दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर १,७९९ गुन्हे दाखल करण्यात आले. मास्क न वापरण्यांवर १७९५, सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याप्रकरणी ६८३, विलगीकरणाचे नियम मोडणाऱ्यांवर २३७, हॉटेल्सवर २१७, फेरीवाले १४०, अवैध वाहतूक ९८ तर ६० पानटपऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र ही कारवाई करताना पोलिस दलासदेखील दुसऱ्या लाटेचा फटका बसला असून ५००पेक्षा अधिक पोलिस कर्मचारी करोनाबाधित झाले आहेत, तर ४ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
पश्चिम उपनगरांत सर्वाधिक नियमभंग
मुंबई पोलिसांच्या कारवाईची आकडेवारी पहिली तर पश्चिम उपनगरांत सर्वाधिक नियमभंग झाल्याचे दिसून येते. पश्चिम प्रादेशिक विभागात सर्वाधिक १,७१३ तर, त्यापाठोपाठ १,५३४ गुन्हे उत्तर मुंबईत दाखल करण्यात आले आहेत. मध्य मुंबईत १४९६, पूर्व उपनगरांत १३१६ तर, सर्वात कमी १,२६३ गुन्हे दक्षिण मुंबईत दाखल आहेत.