Home ताज्या बातम्या करोनावर संशोधनाला गती

करोनावर संशोधनाला गती

0
करोनावर संशोधनाला गती

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट येऊ शकते, अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून सातत्याने व्यक्त केली जात आहे. या दोन्ही लाटांमध्ये करोनावर मात केलेल्या रुग्णांची वैद्यकीय स्थिती, त्यांचा करोनामुक्त होण्याचा कालावधी आणि त्यासाठी घेतलेले वैद्यकीय उपचार, असा अतिशय महत्त्वाचा अभ्यास पालिकेच्या रुग्णालयांमधून केला जाणार आहे. या संशोधनातून समोर येणारे निष्कर्ष पुढील काळात करोनावर मात करण्यासाठी निश्चित उपयोगी ठरतील, असा विश्वास आरोग्ययंत्रणेने व्यक्त केला आहे.

करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर वैद्यकीय उपचारपद्धतीसाठी असणारा भार थोडा हलका झाला आहे. या अवधीचा वापर संशोधनासाठी आग्रही पद्धतीने करून हा महत्त्वाचा अभ्यास करण्यात येणार आहे. हा अभ्यास व संशोधन हे आंतरराष्ट्रीय पातळीवरही महत्त्वाचे ठरू शकेल. म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढण्यामध्ये स्टिरॉइडचा अनियंत्रित वापर, तसेच रक्तातील शर्करेचे वाढलेले प्रमाण, असे दोन्ही घटक कारणीभूत असल्याचे दिसून येते. या अभ्यासातून त्याचीही माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

‘संशोधनाचा टप्पा हा वैद्यकीय उपचारपद्धतीइतकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्याला गती देणे अधिक गरजेचे आहे. बीकेसी करोना उपचार केंद्रामध्ये आतापर्यंत २० हजारांहून अधिक रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यात आले आहेत. येथे उपचारासाठी आलेले रुग्ण हे वेगवेगळ्या वेळी, आजाराच्या वेगवेगळ्या टप्प्यांत आले आहेत. त्यांची करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर कितव्या दिवशी ते उपचार घेण्यासाठी आले याचेही वैद्यकीय विश्लेषण करण्यात येणार आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

दुसऱ्या लाटेच्या मध्यावर करोना संसर्गाचे प्रमाण अधिक वाढले. पहिल्या लाटेमध्ये कुटुंबातील एका व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाला. त्यावेळी पूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह होत नव्हते. मात्र, दुसऱ्या लाटेमध्ये कुटुंबामधील जवळपास सर्व सदस्य पॉझिटिव्ह झाल्याचे दिसून आले. त्यामागील नेमके कारण काय, याचाही अभ्यास होण्याची शक्यता आहे.

रेमडेसिवीर, प्लाझा थेरपीचा अभ्यासही महत्त्वाचा

करोनासाठी आजही निश्चित वैद्यकीय उपचारपद्धती नाही, असे संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. आर. एम. नायर यांनी सांगितले. रेमडेसिवीर, टोसिलिझुमॅब, प्लाझ्मा थेरपी रुग्णांना देण्यात आली. काही महिन्यांनी या उपचारांसंदर्भात नवीन निकष लागू करण्यात आले. मात्र, ज्यांना हे उपचार देण्यात आले, त्यातील किती जणांना करोनामुक्त होण्यासाठी मदत मिळाली, याचीही वैद्यकीय नोंद करणे महत्त्वाचे आहे. हा अभ्यास त्यासाठीही गती देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अभ्यासात यावर भर देणार

– मुंबईमधील सर्वाधिक करोनाचा संसर्ग असलेल्या भागांमध्ये मुंबईकरांना संसर्गाची लागण लाटेच्या कोणत्या टप्प्यात झाली.

– त्यापैकीकिती रुग्ण घरी विलगीकरणात होते.

– विलगीकरणात त्यांनी कोणती औषधे घेतली.

– चाचणी केल्यानंतर कितव्या दिवशी ते रुग्णालयात दाखल झाले.

– रुग्णालयात त्यांच्यावर कोणते वैद्यकीय उपचार करण्यात आले.

– त्यातील कोणत्या औषधांचा सर्वाधिक फायदा रुग्णांना झाला.

– कोविडपश्चात उपचारपद्धतीमध्ये कोणत्या प्रकारच्या शारीरिक समस्या सर्वाधिक भेडसावत होत्या.

Source link