उल्हासनगर कॅम्प नंबर दोन परिसरातील खेमानी येथील संत ज्ञानेश्वर नगर परिसरातील अनेक घरांत ‘बेकायदा गृहोद्योग’ सुरू आहेत. अनेक महिला आणि मुले आरटीपीसीआर आणि अँटिजेन चाचण्यांसाठी लागणाऱ्या हजारो किटच्या पॅकिंगचे काम करत आहेत. एक हजार किट पॅकिंगसाठी या महिलांना २० रुपये दिले जात होते. त्यात धक्कादायक बाब म्हणजे, या महिलांना आपण कसल्या किट पॅक करत आहोत, हे काय साहित्य आहे, याची हाताळणी करताना काय काळजी घ्यावी, याबाबत कसलीही माहिती नसल्याने घरातील जमिनीवर, अंगणात अशा ठिकाणी आणि सुरक्षेची कुठलीही काळजी न घेता या किट पॅक केल्या जात आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात चाचणी किटची पूर्तता करण्यासाठी अधिकृत कंपन्यांचे निकष आणि नियम धाब्यावर बसवण्यात येत आहेत.
या किट ज्या शहरांत, प्रयोगशाळा तसेच रुग्णालयांना पुरवल्या जाणार आहेत, त्या तेथे पोहचण्यापूर्वीच करोना विषाणूसह अन्य अनेक जंतूंच्या संपर्कात आलेल्या असू शकतात. हे किट करोना चाचणीसाठी कितपत योग्य आहेत, तसेच या किटद्वारे होणाऱ्या चाचण्यांचे अहवाल कितपत योग्य आहेत, याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
खेमानी भागातील काही नागरिकांनी हा प्रकार समोर आणल्यानंतर महापालिका आणि पोलिसांनी बुधवारी या ठिकाणी छापा टाकत कारवाई केली आहे. या छाप्यात २० हजार बनावट किट जप्त करण्यात आले. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि बनावट किट तयार करणाचे काम देणाऱ्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
‘वापर झाला असल्यास कळवावे’
महापालिकेने पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी छापा टाकून बनावट किट जप्त केले आहेत. मात्र, या किटचा उल्हासनगर शहरात वापर होत नसल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. करुणा जुईकर यांनी सांगितले आहे. तरीही शहरात खासगी डॉक्टर किंवा प्रयोगशाळांमध्ये या किटचा वापर झाला आल्यास त्वरित महापालिकेला कळवावे, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांना केल्याचेही डॉ. जुईकर यांनी सांगितले. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती दिली जाणार असून ते पुढील कारवाई करतील
महापालिकेसोबत पोलिसांनी यावर कारवाई केली आहे. परंतु याबाबत पालिकेने गुन्हा दाखल केल्यास पुढील कारवाई पोलिस करतील.
धुला टेले, सहायक पोलिस आयुक्त, उल्हासनगर