Home ताज्या बातम्या ‘कर्करोगावरील उपचार सुविधांसाठी जपानने मदत द्यावी’

‘कर्करोगावरील उपचार सुविधांसाठी जपानने मदत द्यावी’

0
‘कर्करोगावरील उपचार सुविधांसाठी जपानने मदत द्यावी’

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना जपानच्या ‘जायका’ संस्थेमार्फत अर्थसाह्य केले जात असून, त्याच धर्तीवर राज्यातील विशेषत: कर्करोग उपचारावरील सुविधांच्या उभारणीसाठी सहकार्य करावे, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ. फुकाहोरी यासुक्ता यांच्याकडे आज गुरुवारी मुंबईत केली आहे.

सह्याद्री अतिथीगृहात जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ. यासुक्ता यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आरोग्य विभागाच्या सचिव श्रीमती केरेकट्टा उपस्थित होत्या.

महाराष्ट्र आणि जपानचे नेहमीच सहकार्याचे मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत. पर्यटन तसेच पायाभूत सुविधांच्या विकास कामांसाठी जपान सरकारच्या ‘जायका’ संस्थेमार्फत अर्थसाह्य केले जात आहे. त्यामध्ये मुंबईतील मेट्रोसारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेता महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेच्या उभारणीसाठी ‘जायका’कडून अर्थसाह्य मिळाल्यास त्याचा या क्षेत्राला लाभ होईल. राज्य कामगार आरोग्य विभागाच्या वरळी आणि मुलुंडच्या जागेवर सुपर स्पेशालिटी हॉस्प‍िटल उभारणीसाठी ‘जायका’कडून आर्थिक साह्य मिळावे, असे अपेक्षा आरोग्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

कर्करोग उपचारासाठी ‘रेडीएशन थेरपी’ उपचारासाठी यंत्रणा उभारणीसाठी जपानकडून तंत्रज्ञान आणि अर्थसाह्य उपलब्ध करून देतानाच जालना येथे कर्करोग उपचार रुग्णालय उभारणीसाठी सहकार्य करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या भेटीच्या दरम्यान आरोग्यमंत्र्यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर जपानमधील परिस्थिती, करोना लसीकरणाची स्थिती, लॉकडाऊन, आरोग्य सुविधा याबाबत माहिती जाणून घेतली. महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या जपानी नागरिकांच्या लसीकरणासाठी आवश्यक ती मदत केली जाईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी जपानच्या वाणिज्यदूतांना दिली आहे.

Source link