कर्जमुक्तीमुळे डोक्यावरील कर्जाचे ओझे उतरल्याच्या अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भावना – महासंवाद

    - Advertisement -

    अमरावती, दि. ११ (जिमाका): कर्जमाफीमुळे शासन भक्कमपणे आपल्या पाठीशी उभे असल्याच्या व डोक्यावरील मोठ ओझ कमी झाल्याच्या भावना सुरेन्द्र अरुण सावरकर या शेतकऱ्याने व्यक्त केल्या.इसराइल तोगा इब्राहिम खान पठाण आणि मंगेश भाऊरावजी पाटील या शेतकऱ्यांना दिवाळीआधी राज्य शासनाकडून ५ हजार रुपयांची अग्रिम मदत प्राप्त झाल्याने दिलासा मिळाल्याच्या भावना त्यांनी मांडल्या.

    ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून ७ ऑगस्ट ते ४ नोव्हेंबर या कालावधीत चार टप्प्यात एकूण ८१ हजार ६१८ लाभार्थी शेतकरी कुटुंबांना ७८३ कोटी २२ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. अमरावती तालुक्यातील टाकळी जहांगीर गावातील सुरेन्द्र अरुण सावरकर यांना पहिल्या टप्प्यात कर्जमाफीचा लाभ मिळाला.शेतीसाठी त्यांनी कर्ज घेतले होते. राज्य शासनाच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाल्याने शेतकरी आत्महत्याच करणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासन असे संकटाच्या काळात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

    याच गावातील शेतकरी इसराइल तोगा इब्राहिम खान पठाण म्हणाले, माझ्या शेतातील विहिरीला आजपर्यंत पाण्याची तूट झाली नाही. मात्र, यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे केवळ पाच ते सहा तासांनंतरच विहिरीचा पाणीपुरवठा खंडित होतो. अशा स्थितीत शेती करणे कठीण होत आहे. अशात राज्य शासनाकडून मिळालेली ५ हजारांची अग्रिम रक्कम मोलाची ठरली.राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना आखल्या आहेत. त्या सर्व योजना व उपक्रमांचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    मंगेश भाऊरावजी पाटील यांनी सांगितले, अमरावती जिल्ह्यासह राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. शेती व शेतकरी संकटात सापडले आहेत. यावर्षी दिवाळीही साजरी करता येणार नाही अशी स्थिती उत्पन्न झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करता यावी म्हणून ५ हजार रुपयांची अग्रीम मदत जाहीर केली. या मदतीचा लाभ अन्य शेतकऱ्यांसह मलाही मिळाला असून, माझ्यासह राज्यातील शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा असल्याचेही त्यांनी सांगितले.

    जिल्ह्यात २ नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांच्या आधारलिंक खात्यात रक्कम जमा केली जात आहे. तालुका व जिल्हास्तरावर खाती स्वीकृत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या ३ लाखांवर खात्यांमध्ये प्रत्येकी ५ हजार याप्रमाणे १५३ कोटीवर रुपये जमा करण्यात आले आहेत. या मदतीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
    ०००००

    - Advertisement -