Home बातम्या राजकारण कर्नाटकनंतर राजस्थान अन् मध्य प्रदेश सरकारं अस्थिर करण्याचा भाजपाचा प्रयत्न- शरद पवार

कर्नाटकनंतर राजस्थान अन् मध्य प्रदेश सरकारं अस्थिर करण्याचा भाजपाचा प्रयत्न- शरद पवार

पुणे: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. देशात पहिल्यांदाच राजकारणासाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे. कर्नाटकनंतर भाजपाकडून राजस्थान आणि मध्य प्रदेशमधली सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय, जे संसदीय लोकशाहीसाठी घातक असल्याचा घणाघात पवारांनी केला आहे. कर्नाटकमधल्या मंत्र्यांना मुंबईत जी वागणूक दिली गेली, ती पाहता राज्यात कायदा आहे का नाही अशा प्रश्न पडला आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतरामध्ये वाढ झाली आहे. ईडी आणि सीबीआयचा यासाठी वापर केला जात आहे.

देश व राज्यातील प्रमुख तपास यंत्रणांचा धाक दाखवून अन्य पक्षातील नेत्यांना भाजपामध्ये प्रवेश दिला जात आहे. निवडणुका जिंकण्यासाठी आर्थिक अडचणीत सापडलेल्या संस्थांच्या प्रमुखांना कायद्याच्या पलिकडे जाऊन मदत पुरवली जातेय. रासपचे आमदार राहुल कुल यांना अडचणीत आणून कांचन कुल यांना भाजपानं निवडणूक लढवायला लावली. पुणे जिल्ह्यातील भीमा पाटस साखर कारखान्याकडे पुणे जिल्हा बँकेचे कर्ज आहे. त्यांचे खाते एनपीएमध्ये आहे. कूल यांच्या मालकीच्या असलेल्या भीमा पाटस साखर कारखान्याला सरकारने आर्थिक मदत केली आणि लोकसभेची निवडणूक लढवण्यास भाग पाडले.

सोलापूरचे कल्याणराव काळे यांचा कारखाना अडचणीत सापडल्यानंतर सरकारनं नियम मोडून त्यांना मदत केली, त्यामुळे त्यांना भाजपामध्ये जावं लागलं. ईडी, सीबीआय यांचा वापर लोकप्रतिनिधींना धमकावण्यासाठी केला जात आहे. सरकार राज्य बँकेद्वारे राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपामध्ये येण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप पवारांनी केला आहे. चित्रा वाघ यांचे पती चौकशीच्या जाळ्यात सापडले आहेत. त्यामुळे चित्रा वाघ घाबरल्या आहेत. चित्रा वाघ मला भेटल्या असून, पतीच्या बचावासाठी पक्ष सोडत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आम्ही त्यांना काहीही मदत करू शकत नसल्याचंही पवारांनी सांगितलं आहे.

राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर दबाव टाकला जात असल्यानं ते पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. मोठ्या नेत्यांच्या सहकारी संस्थांना मदत करण्याच्या नावाखाली भाजपा त्यांना आपल्या पक्षात घेऊन निवडणूक लढवण्यासाठी दबाव टाकत आहे. हसन मुश्रीफ यांना भाजपात येण्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु त्यांनी नकार देताच प्राप्तिकर विभागामार्फत त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. सत्ताधारी भाजपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेचा गैरवापर करत आहे.