Home बातम्या राजकारण कर्नाटक: येडियुरप्पांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

कर्नाटक: येडियुरप्पांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

कर्नाटकातील बी. एस. येडियुरप्पा सरकारनं आज, सोमवारी विधानसभेत आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यामुळं आता कर्नाटकातील सत्ता भाजपच्या हाती आली आहे. 

काँग्रेस-जेडीएस सरकार बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पांनी सरकार स्थापनेचा दावा केला होता. त्यानंतर शुक्रवारी राजभवनातील सोहळ्यात राज्यपालांनी येडियुरप्पांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती. येडियुरप्पांना आज, सोमवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे होते. अखेर या शक्तिपरीक्षेत येडियुरप्पा उत्तीर्ण झाले. त्यांनी आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. 

तत्पूर्वी, येडियुरप्पांनी सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडताना, ‘प्रशासन अपयशी ठरलं आहे. आम्ही कारभार सुस्थितीत आणू. आम्ही सुडाचे राजकारण करणार नाही.’ अशी ग्वाही दिली. एकत्रित मिळून काम करू. माझ्यावर विश्वास ठेवा असं आवाहन मी विरोधकांना करतो, असेही ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी येडियुरप्पांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री येडियुरप्पा हे राज्यातील जनतेसाठी काम करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.