चित्रकला, रंगकाम किंवा कलाकुसरीच्या वस्तूंची निर्मिती यातून अनेक सर्जनशील व्यक्ती आपली सर्जनशीलता व्यक्त करतात. विविध कलाक्षेत्रांतील संधींवर नजर टाकली, की त्यांची व्याप्ती, आपली आवड आणि त्या क्षेत्रांतील आपल्याला असलेला वाव यातून आपल्याला अभ्यासक्रमाची निवड करता येते.
शाळेत असताना ज्यांनी इंटरमिजिएट ड्रॉइंगची परीक्षा दिली आहे, त्यांना दहावीनंतर मूलभूत अभ्यासक्रमाला (फाउंडेशन) एक वर्षाचा प्रवेश मिळू शकतो. फाउंडेशन उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना थेट जी. डी. आर्ट्स या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. चित्रकला परीक्षेत ज्यांना ‘अ’ श्रेणी किंवा ‘ब’ श्रेणी मिळाली आहे, त्यांनी या क्षेत्राचा आवर्जून विचार करावा. यात फाइन आर्ट्स किंवा कमर्शिअल आर्ट अशी विभागणी होते. एकूण पाच वर्षांचा हा अभ्यासक्रम राज्यातील सर्व प्रमुख शहरी भागांत उपलब्ध आहे.
जी. डी. आर्ट या चार वर्षांच्या पदविका अभ्यासक्रमानंतर एक वर्षाचा ‘डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन’ (डिप. ए. एड.) हा डिप्लोमा पूर्ण करता येतो. उच्च कला शिक्षणसंस्थांत ‘डिप. ए. एड.’ झालेल्या विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्याने सेवेत घेतले जाते. ‘आर्ट मास्टर’ (ए. एम.) हा एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमही ‘जी.डी. आर्ट’ पदविकेनंतर पूर्ण करता येतो. ए. एम. असलेल्या व्यक्तीस कला संस्थांकडून सेवा बढती व सुधारित वेतनश्रेणीचा लाभ होतो. या व्यतिरिक्त बारावीनंतर विद्यार्थ्यांना दोन वर्षांचा ‘आर्ट टीचर्स डिप्लोमा’ (ए.टी.डी.) हा पदविका अभ्यासक्रमही निवडता येतो.
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र अशी मान्यवर विद्यापीठे व समीक्षक संस्थांत उच्च कला शिक्षणाचे विविध अभ्यासक्रम राबविले जातात. त्यापैकी एक वर्षाचा ‘बॅचलर ऑफ फाइन आर्ट’ (बी.एफ.ए.) ब्रीज कोर्सद्वारे, ‘जी. डी. आर्ट’ डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रम व दर्जा मिळविता येऊ शकतो. उपयोजित कला, रंग-रेखाकला व शिल्पकला या प्रमुख विषयांतील चार वर्षांचा ‘बॅचलर ऑफ फाइन आर्ट’ (बी.एफ.ए.) हा पदवी अभ्यासक्रम बारावी समकक्ष परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येऊ शकतो.
राज्यात उच्च कलाशिक्षण संस्था वाढत असतानाच केवळ महिलांसाठी कला शिक्षण देणारे ‘एसएनडीटी’ विद्यापीठही कार्यरत आहे. दृश्यकला (व्हिजुअल आर्ट) विषयातील पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांबरोबरच ‘एम फील’ आणि पीएच.डी असे संशोधन अभ्यासक्रमही या विद्यापीठात अनेक वर्षांपासून यशस्वीपणे राबविले जात आहेत. कला क्षेत्रातील पुरुष व महिला कलाकारांना संधी असून, सर्जनशील, संगणक कुशल, संवादक्षम व माहिती तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून सातत्याने ‘अपडेट’ असणाऱ्या कलाकारांची विविध क्षेत्रांतील आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून निवड होताना आढळते.
कलाक्षेत्रातील संधी देणाऱ्या संस्था
१) सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट
पत्ता : डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई ४००००१
२) शासकीय चित्रकला महाविद्यालय
पत्ता : दीक्षाभूमीसमोर, लक्ष्मीनगर, नागपूर
३) रचना संसद
पत्ता : २७८, शंकर घाणेकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०००२५.
४) अभिनव कला महाविद्यालय
पत्ता : टिळक रोड, पुणे ४११०३०
५) अभिनव कला महाविद्यालय
पत्ता : पाषाण, पुणे ४११००८
६) एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट
पत्ता : सेंट मार्टिन्स रोड, बांद्रा (प.) मुंबई ४११०५०
७) आबनावे कला महाविद्यालय
पत्ता : ४८४, सदाशिव पेठ, टिळक रोड, पुणे ४११०३०
८) कला सागर कला महाविद्यालय
पत्ता : सिंहगड रोड, पुणे
९) साई चित्रकला महाविद्यालय
पत्ता : कात्रज, पुणे
१०) चित्रलीला निकेतन कला महाविद्यालय
पत्ता : शनिवार पेठ, पुणे ३०