कल्याणमधील इमारतीचा स्लॅब कोसळल्याने जीवितहानी – महासंवाद

 कल्याणमधील इमारतीचा स्लॅब कोसळल्याने जीवितहानी – महासंवाद
- Advertisement -

 कल्याणमधील इमारतीचा स्लॅब कोसळल्याने जीवितहानी – महासंवाद

एकूण सहा जखमी तर सहा जणांचा मृत्यू; तहसिलदार कार्यालयाकडून अहवाल सादर

ठाणे, दि.20(जिमाका):- कल्याण शहरातील कल्याण (पूर्व) चिकणीपाडा येथील सप्तशृंगी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या पाच मजली निवासी इमारतीमधील चौथ्या मजल्यावर फरशी बसविण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना चौथ्या मजल्याचा स्लॅब खाली कोसळला आणि ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकूण ६ व्यक्ती जखमी झाल्या असून ६ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती तहसिलदार सचिन शेजाळ यांनी दिली आहे.

तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, कल्याण यांनी दिलेल्या अहवालानुसार, ही घटना दि. २० मे २०२५ रोजी दुपारी २.०० वाजताच्या सुमारास घडली. ही दुर्घटना घडल्यानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अशोक शिनगारे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाने तात्काळ मदत व बचाव कार्य सुरू केले.

त्याचबरोबर घटनेनंतर प्रशासनाकडून तातडीने पंचनामा करण्यात आला असून, जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

घटनास्थळावरील शोध कार्य पूर्ण झाले असून इमारतीतील नागरिकांना जवळील ज्ञानमंदिर विद्यालय, कल्याण (पूर्व) येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे त्या सर्वांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळाल्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेतील मृत सहा नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. तसेच मृतांच्या कुटुंबियांना शासनातर्फे प्रत्येकी पाच लाखांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणाही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केली आहे.

जखमी व्यक्तींची यादी:

अ.क्र. १: अरुणा रोहिदास गिरनारायण (महिला, ४८ वर्षे) – अमेय हॉस्पिटल

अ.क्र. २: यश जितेंद्र क्षीरसागर (मुलगा, १३ वर्षे) – चैतन्य हॉस्पिटल

अ.क्र. ३: निखिल खरात (पुरुष, २६ वर्षे) – चैतन्य हॉस्पिटल

अ.क्र. ४: विनायक मनोज पार्धी (मुलगा, ४.५ वर्षे) – आशिर्वाद हॉस्पिटल

अ.क्र.५: श्रावील श्रीकांत शेलार (मुलगा, ४.३ वर्षे) – आशिर्वाद हॉस्पिटल

अ.क्र. ६: श्रद्धा साहू (महिला, १४ वर्षे) – बाई रुक्मिणी हॉस्पिटल

मृत व्यक्तींची यादी:

अ.क्र. १: श्रीमती. सुशिला नारायण गुजर (महिला, ७८ वर्षे) – चैतन्य हॉस्पिटल

अ.क्र. २: कु.नामस्वी श्रीकांत शेलार (महिला, १.५ वर्षे) – आशिर्वाद हॉस्पिटल

अ.क्र. ३: श्री. व्यंकट चव्हाण (पुरुष, ३२ वर्षे) – घटनास्थळी

अ.क्र. ४: श्रीमती सुनिता निरंजन साहू (महिला, ३८ वर्षे) – चैतन्य हॉस्पिटल

अ.क्र. ५: श्रीमती. प्रमिला कालीचरण साहू (महिला, ५६ वर्षे) – चैतन्य हॉस्पिटल

अ.क्र. ६: श्रीमती.सुजाता मनोज पाडी (महिला, ३२ वर्षे) – घटनास्थळी

00000000

- Advertisement -