कल्याण-डोंबिवलीचे रूप आता स्वच्छतेच्या माध्यमातून बदलेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

कल्याण-डोंबिवलीचे रूप आता स्वच्छतेच्या माध्यमातून बदलेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
- Advertisement -

ठाणे, दि.18(जिमाका)- आपले शहर स्वच्छ आणि सुंदर असावे, असे कल्याण-डोंबिवलीकरांचे स्वप्न आहे आणि स्वच्छतेच्या या  आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे कल्याण डोंबिवलीचे रूप, स्वच्छतेच्या माध्यमातून निश्चित बदलेल,असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलात विविध उपक्रमांचे लोकार्पण व भूमिपूजन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, सुलभाताई गायकवाड, राजेश मोरे, महापालिका आयुक्त अभिनव गोयल, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, परिमंडळ- 3 पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, इतर पदाधिकारी, माजी पालिका सदस्य महापालिका अधिकारी ,मान्यवर व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले, मीही मुख्यमंत्री असताना डीप क्लीन ड्राईव्ह उपक्रम सुरू केला, “स्वच्छता असे जिथे- आरोग्य वसे तिथे” हे वाक्य उधृत करून त्यांनी या स्वच्छता उपक्रमास शुभेच्छा दिल्या.आज लोकार्पण झालेले सगळे प्रकल्प लोकाभिमुख आहेत, अशा शब्दात आयुक्तांची प्रशंसा करीत विकासाला पैसे कमी पडणार नाहीत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

वेगवेगळ्या प्रकल्पांचे विशेषतः स्वच्छता उपक्रमाचे आज लोकार्पण  होत आहे. शहरातील नागरिकांनी देखील स्वच्छतेचे पालन करावे, असे आवाहन आमदार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी बोलताना केले.

कल्याण डोंबिवलीच्या वाढत्या लोकसंख्येला सक्षम प्रणालीची गरज होती. त्यामुळे घनकचऱ्याचा हा नवीन उपक्रम उभा राहत आहे, या उपक्रमांमध्ये महापालिकेतील कामगारांना देखील समाविष्ट करून त्यांना रोजगार द्यावा, अशी सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

कल्याण परिक्षेत्रात मोठे प्रकल्प उभे राहण्यासाठी शासनाने नेहमीच सहकार्य केले आहे. सावळाराम क्रीडा संकुलात देखील आता एलिवेटेड स्टेडियम होईल, अशी माहिती खासदार डॉ.शिंदे यांनी दिली.

आज लोकार्पण होणाऱ्या उपक्रमांची माहिती नेटक्या शब्दात विशद करून कल्याण-डोंबिवलीच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका कटिबद्ध असून  आपल्या सर्व नागरिकांचे सहकार्य देखील तितकेच मोलाचे आहे, असे उद्गार महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आपल्या प्रास्ताविकात काढले.

आजच्या कार्यक्रमात कचरा संकलन, वाहतूक आणि रस्ते स्वच्छता प्रकल्पाचा शुभारंभ, परिवहन उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना धनादेश वाटप , रिंग रोड मधील बाधित लाभार्थ्यांना पुनर्वसन धोरणानुसार सदनिकांचे वितरण,MUTP प्रकल्पातील बाधितांना चाव्यांचे वितरण, टिटवाळा (पूर्व) येथील जागेवर उभारलेल्या सौर ऊर्जेवर आधारित उद्यानाचे ऑनलाईन लोकार्पण, खंबालपाडा क्रीडा संकुलाचे ऑनलाईन भूमीपूजन, परिमंडळ तीन मधील दामिनी पथकासाठी वाहनांचे हस्तांतरण ई कार्यक्रम संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थित मान्यवरांनी स्वच्छता उपक्रमाच्या वाहनांना ध्वजांकन केले.

00000

- Advertisement -