Home बातम्या ऐतिहासिक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सीबीएसईच्या शाळा सुरू कराव्यात – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सीबीएसईच्या शाळा सुरू कराव्यात – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

0
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सीबीएसईच्या शाळा सुरू कराव्यात – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

ठाणे, दि. 17 (जिमाका) : बृहन्मुंबई महानगरपालिकेप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सीबीएसई च्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू कराव्यात, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे केले.

डोंबिवली औद्योगिक वसाहतीमधील 33 किमी रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन श्री. ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक,  आमदार प्रमोद पाटील, महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता सुधीर नागे, योगेश म्हात्रे, भाऊ चौधरी, दीपेश म्हात्रे, आदी उपस्थित होते.

पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येबरोबरच शहरे, औद्योगिक परिसर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यांचा शाश्वत विकास करत असताना समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच तरुण या सर्व घटकांचा विचार करायला हवा. त्याचप्रमाणे रस्ते, उद्याने, शाळा, स्वच्छ हवा व पाणी आणि आरोग्य सुविधा कडेही लक्ष द्यायला हवे. त्यामुळे आज कल्याण डोंबिवली परिसरातील विविध विकास कामे जोरात सुरू आहेत. त्यासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे.

गेल्या दोन वर्षांच्या काळात राज्य शासनाने अतिशय चांगली कामे केली आहेत. कोविड काळात केलेल्या कामांची दखल जागतिक पातळीवर घेतली आहे. यापुढे ही या भागाचा शाश्वत विकास व्हावा यासाठी कामे केली जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कल्याण डोंबिवलीमध्ये विकास कामांबरोबरच पर्यावरण संतुलनावर भर – पालकमंत्री

पालकमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सर्वसामान्यांच्या हितासाठी राज्य शासन अनेक निर्णय घेत आहे. त्यांच्यासाठी मूलभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. या भागात विकासाची गंगा आणण्याचे काम होत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील कामांवर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लक्ष देत असतात.

रस्ते व उंच इमारती झाल्या म्हणजे विकास झाला असे नाही. त्याबरोबरच खेळांची मैदाने, उद्याने व्हायला हवी. तसेच मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड व शहरी जंगले (अर्बन फॉरेस्ट) निर्माण करण्यावर भर देऊन पर्यावरणाचा समतोल राखला जावा. डोंबिवलीमधील लोकांच्या जिवीतास घातक असे कारखान्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. हे करत असताना येथील कामगारांचाही विचार केला जाईल, असेही पालकमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, डोंबिवलीतील औद्योगिक व नागरी भागातील नागरिकांची मागणी या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामुळे पूर्ण होत आहे. निवासी भागातील रस्त्यांची कामेही पुढील काही दिवसांत सुरू होतील. या भागात चांगले रस्ते, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचबरोबर कल्याण व डोंबिवली मध्ये आणखी दोन डायलिसिस सेंटर सुरू करण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली भागातील विविध विकास कामांमुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

यावेळी श्री. ठाकरे यांच्या हस्ते 33 किमी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.  श्री. नागे यांनी आभार मानले.

000