Home ताज्या बातम्या काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदावर डोळा; आठवलेंनी दिला ‘हा’ सल्ला

काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदावर डोळा; आठवलेंनी दिला ‘हा’ सल्ला

0
काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदावर डोळा; आठवलेंनी दिला ‘हा’ सल्ला

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा केल्यानंतर आणि मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा व्यक्त केल्यानंतर राज्यात राजकीय टीकाटिप्पणीला उधाण आलं आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्षाच्या नेत्यांनी पटोले यांच्या वक्तव्यावर सावध प्रतिक्रिया व्यक्त केली असली तरी राज्यातील विरोधक सत्ताधाऱ्यांना डिवचण्याची संधी साधली आहे.

मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या वक्तव्यांवर रिपब्लिकन पक्षाचे नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपलं मत मांडलं आहे. ‘फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही तर काँग्रेस पक्षानं मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरला पाहिजे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर तरलेलं सरकार आहे. काँग्रेसनं पाठिंबा काढला तर महाविकास आघाडी सरकार पडेल. त्यामुळं काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरावा आणि हे पद दिलं जात नसेल तर काँग्रेसनं महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढावा, असा सल्ला आठवले यांनी दिला आहे.

पटोले यांनी अलीकडंच एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री बनण्याची इच्छा बोलून दाखवली होती. तसंच, काँग्रेस निवडणुका स्वबळावर लढेल, असंही पटोले सातत्यानं सांगत आहेत. त्यावरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपापली भूमिका मांडली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पटोले यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस स्वबळावर मोदींना व भाजपला पराभूत करू शकणार असेल तर आम्ही सगळे काँग्रेसच्या पाठिशी राहू, असं सूचक वक्तव्य राऊत यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पटोले यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. ‘आघाडीतील प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे आणि स्वप्न बघण्याचा अधिकारही सर्वांना आहे. प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा असते. सध्या तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा फॉर्मुला ठरला आहे,’ असं अजित पवार स्पष्ट केलं आहे.

‘निवडणुका आघाडी करून लढायच्या की स्वबळावर लढायच्या याचा निर्णय त्या-त्या पक्षाचे प्रमुख नेते घेत असतात. काँग्रेसमध्ये हा निर्णय सोनिया गांधी घेतात. राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आणि शिवसेनेमध्ये तो अधिकार उद्धव ठाकरे यांचा आहे. त्यामुळं आम्ही त्यावर बोलणं योग्य नाही,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Source link