Home बातम्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड

0

नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी अखेर सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्याझालेल्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच गांधी कुटुंबातील कुठलीही व्यक्ती काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. तेव्हापासून काँग्रेसमध्ये नव्या अध्यक्षाचा शोध सुरू होता. मात्र आज झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीची बैठकीत अध्यक्षपदासाठी कुठल्याही नेत्याच्या नावावर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे अखेरीस सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. 

आजच्या बैठकीत यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, ज्योतिरादित्य शिंदे आणि ए. के. एन्टोनी यांच्यासह अनेक दिग्गज काँग्रेसचे नेते उपस्थित होते. तर, या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी उशिरा पोहोचले.  दरम्यान, सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्षपदी निवड जाहीर  होण्यापूर्वी  बैठकीतून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील सध्याची स्थिती लक्षात घेऊन काँग्रेस अध्यक्षपद निवडीची प्रक्रिया तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे सांगितले होते.  

दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षपदी अनेक नेत्यांची नावे चर्चेत असल्याचे सांगण्यात येत होते. प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, मुकुल वासनिक, सुशीलकुमार शिंदे, ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांच्याही नावांचा समावेश असल्याचे बोलले जात होते.