Home ताज्या बातम्या काँग्रेसवर शरसंधान; पटोलेंच्या वक्तव्यांच्या निमित्ताने पवारांचा नेत्यांना संदेश

काँग्रेसवर शरसंधान; पटोलेंच्या वक्तव्यांच्या निमित्ताने पवारांचा नेत्यांना संदेश

0
काँग्रेसवर शरसंधान; पटोलेंच्या वक्तव्यांच्या निमित्ताने पवारांचा नेत्यांना संदेश

‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोयीने होणार आहे. विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसलाच मिळणार असले, तरी निवडणुकीची वेळ आम्ही ठरवू आणि उमेदवारही आमच्या पसंतीला उतरला पाहिजे, अशी शिवसेना-राष्ट्रवादीची अप्रत्यक्ष अट काँग्रेसला मान्य करावी लागणार आहे.

‘प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले वगैरे ही लहान माणसे असून, आपण त्यांच्यावर बोलणार नाही. सोनिया गांधी बोलल्या असत्या तर आपण बोललो असतो,’ अशी खोचक टिप्पणी शरद पवार यांनी नुकतीच केली. पवारांची ही टिप्पणी केवळ पटोले यांच्यापुरती मर्यादित नसून, दिल्लीतील राहुल गांधींच्या मर्जीतील काँग्रेसच्या नेत्यांनाही त्यातून पवारांनी संदेश दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लवकर व्हावी म्हणून राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून काँग्रेसचे दोन-तीन सरचिटणीस गेल्या दोन महिन्यांपासून मुख्यमंत्री ठाकरे आणि पवार यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात के. सी. वेणुगोपाळ, एच. के. पाटील आणि रणदीपसिंह सुरजेवाला यांचा समावेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पण या महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसपाशी तुल्यबळ नेताच नसल्याचे भासवून पवार आणि ठाकरे यांनी त्यांना हुसकावून लावले आहे. पटोले यांच्यावर टिप्पणी करताना पवारांचा खरा रोख राहुल गांधींच्या मर्जीतील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर असल्याचे म्हटले जात आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना, दीर्घ चर्चेअंती विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांचे राजकीय सल्लागार दिवंगत अहमद पटेल यांचा आग्रह निर्णायक ठरला होता. आघाडीच्या सरकारमध्ये महत्त्वाचे ठरणारे विधानसभेचे अध्यक्षपद सरकारचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत स्थिर राहील, असेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने गृहित धरले होते. पण काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड केली आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होण्यासाठी पटोले यांनी १४ महिन्यांतच विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्षपदाचे महत्त्व आणि गांभीर्य लक्षात घेता पटोलेंना बदलू नका, असे मुख्यमंत्री ठाकरे आणि पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना बजावले होते. पण, त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून पटोले यांनी राजीनामा दिला. ही मनमानी करणाऱ्या काँग्रेसला आता अध्यक्षपदासाठी आणखी प्रतीक्षेची शिक्षा भोगावी लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुहूर्त आणि उमेदवाराच्या नावाविषयी काँग्रेसच्या सरचिटणीसांसह दिल्लीतील इतर नेत्यांशी चर्चा करण्याचे टाळून मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांनी या मुद्यावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केल्याचे मानले जात आहे.

Source link