
मुंबई, दि. ११ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांच्या विद्यमाने उद्या १२ एप्रिल, २०२५ रोजी भुरामाई हॉल, शांतीलाल मोदी रोड, ईराणी वाडी, कांदिवली (पश्चिम), मुंबई येथे सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त शैलेश अर्जुनराव भगत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या मेळाव्यामध्ये मुंबईतील नामांकित कंपन्या आपल्या रिक्त पदासह उपस्थित राहून त्याच ठिकाणी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत व प्राथमिक निवड केली जाणार आहे. यावेळी शासनाच्या विविध महामंडळामार्फत सवलतीच्या कर्जाची माहिती दिली जाणार आहे. तसेच उमेदवारांना मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या प्रशिक्षण संस्था हजर राहणार आहेत.
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तसेच प्रधानमंत्री इन्टर्न योजना अंतर्गत प्रशिक्षणाचा लाभ उमेदवारांना मिळणार आहे. तरी १० वी, १२ वी उत्तीर्ण/आयटीआय / विविध शाखेचे पदवीधर उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी या महारोजगार मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रसिद्धपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
०००
गजानन पाटील/ससं/