सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : कामगारांच्या तसेच त्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधांबाबत अडचणी मांडाव्यात. कामगार कल्याण मंडळाच्या इमारतीमध्ये विविध सोयी सुविधा देण्यासाठी दीड कोटी रूपयांचा निधी जिल्हा नियोजन मधून देऊ, अशी ग्वाही कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी दिली.
औद्योगिक वसाहत सांगली येथील ललित कलाभवन येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय सांगली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गटस्तरीय कामगार पुरूष व व महिला खुली भजन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी वसंतदादा औद्यागिक सहकारी सोयायटी लि. सांगली चे चेअरमन सचिन पाटील, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, प्रभारी कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार, सहाय्यक कल्याण आयुक्त समाधान भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव, विशेष कार्य अधिकारी प्रमोद फडणवीस, रमेश आरवाडे, सतिश सलगर, रंगराव इरळे, आदि मान्यवर उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाने कामगार कल्याण मंडळाच्या इमारतीमध्ये विविध सोयी-सुविधा देण्यासाठी तसेच नुतनीकरणासाठी त्वरीत अंदाजपत्रक तयार करावे, अशा सूचना देवून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, भजन स्पर्धेत संघाना सादरीकरणासाठी असणारे सध्याचे मानधन कमी असून त्यांचे मानधन वाढवावे. कामगारांना आरोग्य विषयक किंवा इतर कोणतीही अडचण आली तर त्यांनी त्वरीत संपर्क साधावा, त्यासाठी निश्चित मदत करू अशी ग्वाही देऊन विजेत्या संघाचे अभिनंदन करून सर्व संघांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
वसंतदादा औद्यागिक सहकारी सोयायटी लि. सांगली चे चेअरमन सचिन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी कामगार कल्याण मंडळाच्या इमारतीमध्ये वुडन बॅडमिंटन कोर्ट तसेच इमारतीच्या नुतणीकरणासाठी भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली.
भजन स्पर्धेत महिला व पुरूषांच्या प्रत्येकी 10 संघानी सहभाग घेतला होता. खुली महिला भजन स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त कामगार कल्याण केंद्र अकोला वासुद, व्दितीय क्रमांक प्राप्त कामगार कल्याण केंद्र मांजर्डे, तृतीय क्रमांक प्राप्त ललित कला भवन सांगली, तर कामगार पुरूष भजन स्पर्धेतील प्रथक क्रमांक प्राप्त कामगार कल्याण केंद्र कुंडल, व्दितीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र सातारा व तृतीय क्रमांक प्राप्त कामगार कल्याण केंद्र मंगळवेढा या संघाना पालकमंत्री डॉ. सुरेख खाडे यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. त्याचबरोबर उत्कृष्ठ गायक, पेटीवादक व तालसंचनमध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त महिला व पुरूष यांनाही पारितोषिक वितरीत करण्यात आले. गंभीर आजार उपचार सहाय्यता योजनेंतर्गत प्रतिकात्मक धनादेशाचे वितरण कल्पना ओळेकर, दादासो शेळके, निलांबरी पवार, अविनाश मोरे, सचित औटे, सुरेश कदम यांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीस प्रथम क्रमांक प्राप्त महिला व पुरूष संघाने पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत सादरीकरण केले.
स्वागत व प्रास्ताविक महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश पाटील यांनी केले. आभार सहाय्यक कल्याण आयुक्त समाधान भोसले यांनी मानले. या कार्यक्रमास स्पर्धा परीक्षक दिलिप टोमके, अरूण जोशी, गीता दातार, भजनी मंडळाचे महिला व पुरूष, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.