Home शहरे उस्मानाबाद कामगार कार्यालयातील कर्मचऱ्याकडूनच कामगारांची आर्थिक लुबाडणूक संबंधितांवर कारवाईची मागणी

कामगार कार्यालयातील कर्मचऱ्याकडूनच कामगारांची आर्थिक लुबाडणूक संबंधितांवर कारवाईची मागणी

उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । २१ मे : लॉकडाऊनच्या काळात जगण्यासाठी धडपडणाऱ्या कामगार मजुरांची आर्थिक लुबाडणूक संबंधित कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी करत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. नोंदणीकृत प्रत्येक कामगारांना मिळणाऱ्या शासकीय अनुदानातून प्रत्येकी हजारोंची रक्कम संबंधित कंत्राटी कर्मचारी करत असल्याची तक्रार कामगार मजुरांनी केली आहे.

सरकारी कामगार कार्यालया मार्फत नोंदणीकृत कामगारांना शासन विविध प्रकारचे अनुदान देत असते. त्यात अवजारे खरेदीसाठी, कामगार मजुरांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी, वैद्यकीय उपचारासाठी, मुलीच्या लग्नासाठी, घरकुलासाठी आदी विविध प्रकारची अनुदाने दिली जातात. यासाठी संबंधित कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी प्रत्येक कामगारांकडून हजारो रुपयांची लुबाडणूक करत असल्याचे बामणी (ता. उस्मानाबाद) येथील कामगार मजुरांनी सांगितले आहे.

दरम्यान लॉकडाऊन काळात नोंदणीकृत सर्व कामगारांना अनुदान दिले जात आहे. यातही कामगार मजूर यांचेकडून शेकड्यात रुपये वसूल केले जात आहेत. ज्यांच्या कडून वसुली करण्यात आली अश्या कामगारांच्याच खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाते. असे या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून लुबाडणूक करण्यात आलेल्या कामगारांचे म्हणणे आहे.

तुळजापूर येथे कामगार कार्यालयात त्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे वडील शिपाई असल्याचे सांगितले जाते. त्यांच्याच वशील्याने हा कंत्राटी कर्मचारी भरती झाला आहे. भरती होऊन कांही महिनेच झाले असून त्याने कामगार मजुरांची राजरोस लुबाडणूक चालू केली आहे. याबाबत सरकारी कामगार अधिकारी श्री काशीद यांना विचारणा केली असता, प्रकरण गंभीर असून या प्रकरणी संबंधितांची तात्काळ चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, लॉकडाऊन काळात सर्वांची आर्थिक परिस्थिती दयनीय झाली आहे. कामगार मजुरांचे तर जीवनावश्यक गरजा भागविणेही कठीण झाले आहे. दान दात्यांच्या आणि सरकारी मदतीवरच सर्व कामगार मजुरांची मदार आहे. आशा हालाकीच्या परिस्थितीतही संबंधित कंत्राटी कर्मचारी जनतेची लुबाडणूक करत आहे. त्यावर कायदेशीर कारवाई करून संबंधित कार्यालयातून तात्काळ कार्यामुक्त करावे. अशी मागणी केली जात आहे.