कारंजा येथील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी सहा जणांवर गुन्हा !

- Advertisement -

कारंजा लाड (वाशिम) :  कारंजा नगर परिषदेअंतर्गत येणाऱ्या मुलजी जेठा हायस्कुलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गखोलीत इंग्रजी विषयाची तासिका सुरू असताना दोन वर्गमित्राच्या भांडणात तौफीक हसन पप्पुवाले या विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी हसन छोटु पप्पुवाले उर्फ रन्नु पप्पुवाले (५३) रा. गवळीपुरा कारंजा यांच्या फिर्यादीवरून कारंजा शहर पोलिसांनी २८ नोव्हेंबर रोजी प्राचार्य, वर्गशिक्षकांसह सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल केला.

कारंजा नगर परिषदेअंतर्गत येणाऱ्या मुलजी जेठा हायस्कुलमध्ये बुधवारी सकाळी इयत्ता दहावीच्या वर्गखोलीत इंग्रजी विषयाची तासिका सुरू होती. यादरम्यान दोन विद्यार्थ्यांमध्ये काही कारणास्तव अचानक भांडण  झाले. त्यातील एकाने तौफीक हसन पप्पूवाले (वय १६ वर्षे) याचा गळा दाबल्याने यामध्ये त्याचा मृत्यू झाला. २८ नोव्हेंबर रोजी हसन छोटु पप्पुवाले उर्फ रन्नु पप्पुवाले यांनी फिर्याद दिल्याने कांरजा शहर पोलिसांनी मुलजीजेठा हायस्कुलचे प्राचार्य निशानराव, वर्गशिक्षक गजानन टाले, शोभा बिडकर व दोन शिपायांसह अल्पवयीन विद्यार्थ्यावर भादंविच्या कलम ३०४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेचा अधिक तपास ठाणेदार एस. एम. जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे करीत आहेत.

- Advertisement -