अंकिताने सुशांतच्या पहिल्या पुण्यतिथी निमित्ताने घरी होम- हवन केले. त्याचे काही फोटो तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. या फोटोंच्या बँकग्राऊंडला ओमचा मंत्र घोष ऐकू येत आहे. अर्थात या फोटोंमध्ये अंकिता कुठेही दिसत नाही. परंतु अंकिताच हा होम करत असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अंकिताने याआधीही सुशांतच्या आठवणी शेअर केल्या होत्या. काही दिवसांपूर्वी अंकिताने सोशल मीडियापासून दूर राहणार असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. परंतु सुशांतच्या पहिल्या स्मृतीदिनाच्या एक दिवस आधी अंकिता पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे. पूजेचे फोटो शेअर करण्याआधी तिने समुद्रकिनारी उभे असलेले स्वतःचे फोटो शेअर केले. या फोटोमध्ये ढगांनी भरून आलेलं आभाळ दिसत आहे. भरलेल्या आभाळाकडे पाहतानाचा अंकिताचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
अंकितानं हा फोटो शेअर करताना लिहिले आहे, ‘अंतर किती आहे हे महत्त्वाचे नाही कारण शेवटी आपण सर्व एकाच आभाळाखाली उभे असतो.’ यातून अंकिताने सुशांतला खास मेसेज दिल्याचा अंदाज अनेक चाहते लावताना दिसत आहेत. दरम्यान, सुशांतच्या आकस्मिक निधनानंतर अंकिताने सांगितले होते की, आयुष्यामध्ये पराभूत होऊन जीवन संपवणारा सुशांत नव्हता. सुशांतच्या कुटुंबियांसोबतच अंकिताने देखील त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी केली होती.
अंकिता आणि सुशांतच्या प्रेमकथेला ‘पवित्र रिश्ता’ मालिकेपासून सुरुवात झाली होती. त्यांच्यातील हे नाते सहा वर्षे होते. त्यामुळे हे दोघेजण लग्न करतील अशी सर्वांचीच अपेक्षा होती. ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन देखील त्या दोघांची जोडी खूपच लोकप्रिय होती. काही वर्षांनी सुशांतने टीव्हीच्या मनोरंजन विश्वातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर अंकिताचे आणि सुशांतचे ब्रेकअप झाले.