रायगड-अलिबाग, दि. ७ (जिमाका) : पेण तालुक्यातील निधवली ग्रामपंचायत हद्दीतील कावजीवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या कातकरी कुटुंबांना प्रशासनाने तातडीने मदतीचा हात दिला आहे. दुर्घटनेतील जखमींवर तात्काळ उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून, संबंधित कुटुंबांना आवश्यक शासकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे.

आज दि. ७ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता डोंगराचा मलबा कातकरी कुटुंबांच्या घरांवर कोसळल्याने पाच कुटुंबे आपदग्रस्त झाली. दुर्घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
या दुर्घटनेत गुलाब दशरथ वाघमारे, अविनाश काशिनाथ वाघमारे, जना काशिनाथ वाघमारे, निर्मला प्रकाश वाघमारे आणि प्रवीण वामन पवार यांच्या कुटुंबांना फटका बसला आहे. या पाच कातकरी कुटुंबांवर अचानक संकट ओढवले असून, त्यांच्या घरांचेही नुकसान झाले आहे.
दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना रायगड जिल्हा परिषद शाळा, कावजी येथे तात्पुरता आसरा देण्यात आला आहे. त्यांच्या तातडीच्या उपचाराची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. आपदग्रस्त कुटुंबांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत.

दुर्घटनेनंतर परिसरातील वीजपुरवठ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेतील विद्युत मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले असले, तरी विद्युत जोडणी झालेली नसल्याने वीजपुरवठा उपलब्ध नव्हता. याबाबत अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित, रायगड यांच्याशी संपर्क साधून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या माध्यमातून विद्युत सुविधेसाठी दोन सौर दिवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच आठ दिवस पुरेल इतका धान्यसाठाही आपदग्रस्तांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
दरम्यान, दुर्घटनाग्रस्त कुटुंबांच्या परिस्थितीची पाहणी केल्यानंतर काही महत्त्वाचे सामाजिक प्रश्नही प्रशासनाच्या निदर्शनास आले. कुमार हरेश महादू वीर, वय १२ वर्षे, याचे आधारकार्ड नसल्याचे, तर कुमारी रेवता महादू वीर, वय ३० वर्षे आणि दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या सानिया महादू वीर, वय ३९ वर्षे यांची नावे मतदार यादीत नसल्याचे आढळून आले. संबंधित बाबींवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दिव्यांग व्यक्तीकडे दिव्यांग प्रमाणपत्र अथवा युडीआयडी कार्ड नसल्यास आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून ते मिळवून देण्याबाबतही ग्रामसेवक व तलाठी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. आपदग्रस्त कुटुंबांना केवळ तात्पुरती मदत न देता त्यांना विविध शासकीय योजनांच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाकडून समन्वयाने कार्यवाही करण्यात येत आहे.
0000






















WhatsApp