Home ताज्या बातम्या काश्मीरी आणि पाकिस्तानी एकच; पाकचे राष्ट्रपती बरळले

काश्मीरी आणि पाकिस्तानी एकच; पाकचे राष्ट्रपती बरळले

0

इस्लामाबाद :जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. या संदर्भात पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी बुधवारी एक वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले की, काश्मीरी आणि पाकिस्तानी एकच असून पाकिस्तानसह त्यांचे सर्व देशवासीय काश्मीरच्या जनतेसोबत आहेत. पाकिस्तानच्या ७३ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित एका मुख्य कार्यक्रमात त्यांनी राष्ट्राला संबोधून भाषण केले. यावेळी ते बोलत होते. 

काश्मीर मुद्दा युनोमध्ये मांडणार असल्याचा पुनरुच्चार 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान तसेच परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी कलम ३७० रद्द केल्यानंतर बरळ ओकली होती. त्यानंतर आता यात पाकचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी उडी घेतली आहे. अल्वी म्हणाले की, भारत सरकारच्या काश्मीरबाबतच्या निर्णायाला आव्हान देण्यासाठी पाकिस्तानकदून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत हा मुद्दा पुन्हा एकदा मांडला जाणार आहे. काश्मीरला बहाल करण्यात आलेल्या विशेष दर्जामध्ये बदल करून भारताने केवळ संयुक्त राष्ट्रच्या संकल्पाचा तसेच शिमला सामंजस्य कराराचे उल्लंघन केले आहे. 

काश्मीरच्या नागरीकांसोबत पाकचे नागरीक…

अल्वी म्हणाले की, जम्मू-काश्मीरशी संबधीत असणारे कलम ३७० रद्द करणे हा आमचा अंतर्गत मुद्दा असल्याचे भारताचे म्हणणे आहे. तसेच, काश्मीर मुद्यावर पाकिस्तानने वास्तव स्विकारावे असाही सल्ला भारतीने पाकिस्तानला दिला होता. मात्र, याला पाकिस्तानचा विरोध असणार आहे. अन्याय झालेल्या काश्मीरी जनतेच्या पाठीशी पाकिस्तानची जनता नेहमीच उभी राहील अशी दर्पोक्ती त्यांनी केली. 

म्हणे आमचे दु:ख एक सारखेच 

पाकिस्तान कोणत्या परिस्थितीत काश्मीरी जनतेला एकटे सोडणार नाही. काश्मीरी आणि पाकिस्तानी एकच असून आमचे दोघांचे दु:ख एक आहे. काश्मीरी जनतेचे अश्रू आमच्या हृदयापर्यंत पोहचतात. आम्ही त्यांच्या सोबत नेहमीच राहणार आहे. भारताकडून नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात असल्याचाही अल्वी यांनी यावेळी आरोप केला. 

पाकिस्तान शांतताप्रिय देश… पाकच्या राष्ट्रपतींची कोल्हेकुई

पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणतात की, ‘पाकिस्तान हा एक शांतताप्रिय देश आहे. काश्मीर विवाद चर्चेतून सोडविणे योग्य आहे. मात्र, भारत आमच्या शांततेच्या नीतीला दुर्बलता समजण्याची चूक करत आहे. अशी ही कोल्हेकुई करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.