Home शहरे अकोला किडनी तस्करी: दोन भावंडांच्या आत्महत्या प्रकरणात अखेर पुण्यातील डॉक्टरवर गुन्हा!

किडनी तस्करी: दोन भावंडांच्या आत्महत्या प्रकरणात अखेर पुण्यातील डॉक्टरवर गुन्हा!

0

अकोला: बार्शीटाकळी तालुक्यातील आळंदा येथील अतुल मोहोड याने किडनी तस्करी रॅकेटच्या दबावाखाली येऊन विषारी औषध प्राशन करून १७ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत डॉ. डेव्हीड जमई याने आर्थिक फसवणूक केल्याचे म्हटले होते. अखेर या प्रकरणात बार्शीटाकळी पोलिसांनी पुण्यातील डॉ. डेव्हीड जमई याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांची चमू पुण्यातील मृतक अतुल रूमवरसुद्धा जाऊन आले.
अतुल अजाबराव मोहोड (२६) आणि त्याचा चुलत भाऊ धीरज संतोष मोहोळ (२६) हे दोघे एकाच कंपनीत कामाला होते. यापैकी धीरजने २६ जुलै रोजी पुण्यात आत्महत्या केली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी अतुल मोहोड याने १७ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी ११ आॅगस्ट ते १६ सप्टेंबर दरम्यान डॉ. डेव्हीड जमईसोबत अतुल मोहोड याचे व्हॉट्सअ‍ॅपवरून झालेले चॅटिंग पोलिसांनी तपासले. या चॅटिंगनुसार अतुलची डॉ. डेव्हीड याने दोन लाखांनी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. डेव्हीडने त्याच्याकडे दुसरा किडनी देणारा व्यक्ती तयार आहे, असे सांगितल्यावर अतुल मोहोड याने त्याला दिलेल्या दोन लाख रुपयांची मागणी केली. तेव्हा डॉ. डेव्हीड याने पैसे परत करण्यास नकार दिल्यानंतर अतुल तणावात आला आणि त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणात बार्शीटाकळी पोलिसांनी डॉ. डेव्हीड जमई याच्याविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्यामुळे भादंवि कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल केला.  

पोलिसांची चमू पुण्यावरून परतली
आरोपी डॉ. डेव्हीड जमई याचा शोध घेण्यासाठी बार्शीटाकळी पोलिसांची एक चमू गुरुवारी पुण्याकडे रवाना झाली होती. या चमूने मृतक अतुल मोहोड जिथे राहत होता. त्या रूमची पाहणी केली असून, आवश्यक ते पुरावे गोळा केले. पोलिसांनी डॉ. डेव्हीडचा पुण्यात शोध घेतला; परंतु तो मिळून आला नाही.

आरोपी दिल्ली येथील रुग्णालयात डॉक्टर
मृतक अतुल मोहोड याने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये डॉ. डेव्हीड जमई हा न्यू दिल्ली येथील साई रेसीडेन्सी बिल्डिंग नंबर १०८ मधील हॉस्पिटल मेमरी लेन येथे काम करीत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पोलीस त्याला अटक करण्यासाठी कोणती पावले उचलतात, डॉ. डेव्हीड याला अटक केल्यास पोलिसांना त्याच्याकडून किडनी तस्करीची मोठी माहिती मिळू शकते.