पण पावसाळ्यात ट्रेकिंग केल्याची ही पहिलीच वेळ. लॉकडाउन सुरू झाल्यापासून घरातच बसून होते. घरात आपलं मनोरंजन करणाऱ्या गोष्टी असल्या तरी बाहेर पडून प्रवास करणं हे मनाला समाधान देणारं असतं. फार दिवासांपासूनची ट्रेकिंगची इच्छा कोरिओग्राफर फुलवा खामरची मुलगी आस्मा हिच्यामुळे पूर्ण झाली. सोंडाई किल्लावर जायचं ठरलंय असं आस्माने सांगितलं त्यावेळी मी प्रचंड खुश झाले.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर घराबाहेर पडून सरळ ट्रेक करणं हे फार गमतीशीर आहे. या ट्रेकला माझ्याबरोबर माझ्या वयाच्या अर्ध्या वयाची मुलं होती. त्या सगळ्यांबरोबर फिरताना मला पुन्हा एकदा माझे कॉलेजचे दिवस जगता आले. एका ट्रॅव्हल कंपनीनं हा ट्रेक आयोजित केला होता. त्यांनी आम्हाला एका बसमधून ट्रेकिंगच्या स्थळी नेलं. हा प्रवास आयुष्यात कायम लक्षात राहील असा ठरला.
किल्ला चढताना असलेली घसरण, ते सततच चालणं हे हवंहवंसं वाटत होतं. निसर्गाच्या सान्निध्यात त्याला मनमुराद अनुभवायचं असेल तर ट्रेकिंग हा उत्तम पर्याय आहे. तो किल्ला चढणं कठीण होतं; पण त्यातच तर खरी मजा आहे. किल्ला चढताना मला जास्त काही त्रास झाला नाही; पण मेहनत लागली हे खरंय. धकाधकीच्या जीवनात कंटाळून गेलेलो आपण असे अधून मधून वेगळं काहीतरी करण्यासाठी बाहेर पडायला हवं.
शब्दांकन : सुरज कांबळे