एका मुलाखतीत रवीनाने सांगितलं की या गाण्याचं चित्रीकरण करणं तिच्यासाठी खूपच कठीण होतं. रवीनाने एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत या एव्हरग्रीन गाण्याच्या चित्रीकरणावेळी आलेल्या अडचणींबद्दल सांगितलं. हे गाणं एका बांधकाम होत असलेल्या इमारतीत चार दिवस चित्रीत करण्यात आलं. शूटच्या ठिकाणी सगळीकडे दगड आणि खिळे होते. हे कमी की काय गाण्यात तिला अनवाणी रहायचं होतं. या सगळ्या गोष्टीची जुळवून घेत असतानाच तिच्या गुडघ्याला दुखापत झाली. या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला सर्वात कठीण वाटत असतील तर तसं नाहीए. या गाण्याच्या चित्रीकरणावेळी रवीनाला मासिक पाळी आली होती. या दरम्यानच तिला १०२ तापही होता.
गाण्याच्या चित्रीकरणासाठी कृत्रिम पाऊस पाडण्यात आला होता. यासाठी अनेक टँकरही मागवले होते. अर्थातच टँकरचं पाणी थंड होतं. १०२ ताप आणि त्यात थंड पाण्यात सलग चार दिवस शूटींग करणं रवीनासाठी मोठं दिव्य होतं. पण तरीही रवीनाने मोठ्या चिकाटीने आणि धैर्याने हे चित्रीकरण पूर्ण केलं. तिच्या या मेहनतीचंच फळ आहे की आजही हे गाणं एव्हरग्रीन आहे.
‘मोहरा’ सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर यात अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्या मुख्य भूमिका होत्या. ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलं आहे. लवकरच ‘सूर्यवंशी’ या सिनेमात या गाण्याचं रिमिक्स व्हर्जन पाहता येणार आहे. या रिमिक्स व्हर्जनमध्ये अक्षय आणि कतरिना कैफ दिसणार आहेत. ‘सूर्यवंशी’ सिनेमाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले असून हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे.