कुकडी प्रकल्पांतर्गत वडज उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती द्यावी – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

कुकडी प्रकल्पांतर्गत वडज उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती द्यावी – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
- Advertisement -




मुंबई,दि. 16 :- कुकडी प्रकल्पांतर्गत वडज उपसा सिंचन योजनेच्या कामाला  सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन या कामास  गती द्यावी.  30 जून पर्यंत या कामाची निविदा निघेल अशा पद्धतीने कामाचे नियोजन करावे, अशा सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगे, कुकडी, वडज, माणिकडोह धरणांच्या प्रलंबित कामांबाबत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी आमदार शरददादा सोनवणे, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अ. ह. धुमाळ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पिंपळगाव जोगे कालवा 1 ते 47 मधील अस्तरीकरण, दुरुस्ती व गळती प्रतिबंधक उपाय योजना करुन हे काम  प्राधान्याने सुरु करावे. माणिकडोह जलाशय बुडित बंधाऱ्याचे काम सुरु करण्याबाबत प्रकल्प आराखडा तयार  करावा. तसेच मीना पुरक कालावा व मीना शाखा कालवा विशेष दुरुस्तीसाठी आराखडा तयार करुन त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी दिल्या.  बैठकीत जुन्नर तालुक्यातील कुकडी  प्रकल्प व इतर धरणातील गाळ काढणेबाबतही  चर्चा करण्यात आली.

00000

एकनाथ पोवार/विसंअ







- Advertisement -