Home गुन्हा कुख्यात गुंड अक्षय राठोडचा पोलीस पथकावर हल्ला,एपीआय जखमी

कुख्यात गुंड अक्षय राठोडचा पोलीस पथकावर हल्ला,एपीआय जखमी

0

यवतमाळ : शहरात कुख्यात अक्षय राठोडने आपला जम बसविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अवैध रेती उत्खननातून आर्थिक पाठबळ मिळत असल्याने अक्षय राठोड व त्याच्या टोळीचे मनोबल वाढले आहे. यातूनच बसस्थानक चौकात अवधूतवाडी ठाण्यातील शोधपथकावर या टोळीने हल्ला केला. यात सहायक पोलीस निरीक्षक किरकोळ जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री ११.३० वाजतादरम्यान घडली. 

अपर पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी शनिवारी रात्री आॅल आऊट मोहीम राबविण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. त्यावरूनच अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील शोधपथक बसस्थानक चौक परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना अक्षय राठोड हा जाताना दिसला.

गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेला अक्षय रात्री ११.३० वाजता कुठे फिरत आहे, अशी चौकशी पोलिसांनी सुरू केली. अक्षय राठोड व त्याच्यासोबत असलेल्या इतर तिघांची झडती पोलिसांनी घेतली. यावरूनच अक्षय राठोड याने वाद घालत मै यवतमाल का भाई हू, अक्षय राठोड हू अशा शब्दात धमकावत पोलिसांशी वाद घालणे सुरू केले. त्याच्या सहकाºयांनी दगडफेक केली. यात सहायक पोलीस निरीक्षक विवेक देशमुख यांच्या उजव्या पायाच्या टोंगळ्याला व छातीला दगड लागला. झटापट करून ते चौघेही पळून जाण्याच्या तयारीत होते.

पोलिसांनी प्रयत्नपूर्वक त्या चौघांनाही ताब्यात घेतले. अक्षय राठोड याच्याजवळ धारदार चाकू मिळून आला. या प्रकरणी शिपाई सुधीर पुसदकर याने तक्रार दिली. त्यावरून अक्षय आत्माराम राठोड (३०) रा.चांदेरेनगर, मोहा फाटा, शुभम हरिओमप्रसाद बघेल (२४) रा.वैभवनगर, बगीरा ऊर्फ आशीष रमेश दांडेकर (३०) रा.चमेडियानगर, सचिन मेघश्याम वाढवे (३१) रा.चांदेरेनगर, धामणगाव रोड यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३३२, ३४ व आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला.