Home ताज्या बातम्या कुपोषणामुळे शून्य ते १४ वयोगटात सर्वाधिक मृत्यू

कुपोषणामुळे शून्य ते १४ वयोगटात सर्वाधिक मृत्यू

0

मुंबई : कुपोषणावरील उपाय महत्त्वाचे आहेतच, पण त्याला आळा घालण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. ‘इंडिया : हेल्थ आॅफ नेशन स्टेट’च्या अहवालानुसार राज्यात कुपोषणामुळे शून्य ते १४ वयोगटातील सर्वाधिक मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. कुपोषणामुळे मृत्यूचे प्रमाण ४५.४ टक्के आहे. याखालोखाल अतिसार, श्वसनविकार या कारणांमुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.

गर्भधारणेपासून ते मूल दोन वर्षांचे होईपर्यंतचा हजार दिवसांचा काळ हा मुलांच्या मेंदूच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. या काळात पुरेसे पोषण मिळाल्यास मूल भविष्यात एक निरोगी आयुष्य जगू शकते व पिढ्यान्पिढ्या चालू असलेले गरिबीचे चक्र भेदण्याच्या कामी त्याचा हातभार लागण्याची शक्यता वाढते. गर्भामध्ये व बाल्यावस्थेमध्ये होणाऱ्या कुपोषणाकडे विशेषत्वाने लक्ष देण्याची गरज असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश सरदेसाई यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे, या अहवालानुसार १५ ते ३९ वयोगटातील व्यक्तींच्या मृत्यूचे महत्त्वाचे कारण हिंसाचार आणि आत्महत्या आहे. याचे प्रमाण १६.२ असून त्याखालोखाल १३.९ टक्के तरुणाई कर्करोगामुळे मृत्यू पावते, असे निरीक्षण मांडले आहे.

याविषयी मानसोपचारतज्ज्ञ
डॉ. सुनंदा शाह यांनी सांगितले की, बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार तरुण पिढीला होत आहेत. त्यात स्पर्धात्मक युगामुळे ताणतणावातही भर पडतेय. दिवसभर काबाडकष्ट करूनदेखील तुमच्या हातात काहीच पडत नसेल तर ही गोष्ट कोणाला सांगता येत नाही. आपल्याला कोणी याबाबत मदतही करू शकणार नाही, अशी भावना मनात तयार होत असल्याने तणावग्रस्त होऊन लोक स्वत:चे जीवन संपवतात. मात्र याला आळा घालण्यासाठी संवाद, सकारात्मक वातावरण, आवडीचा छंद अशा स्वरूपाचे वातावरण निर्माण करण्याची अधिक गरज आहे.
महिला-पुरुषांमध्ये लोहाची कमतरता
अहवालानुसार, महिला व पुरुषांमध्ये लोहाची कमतरता कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर ऐकणे-दृष्टीची क्षमता हरविणे, पाठीचे दुखणे आणि मायग्रेन अशा समस्या अधिकाधिक उद्भवत असल्याचे निरीक्षण मांडले आहे. याखेरीज, वैद्यकीय तज्ज्ञांनी सामान्यांनी आरोग्याकडे अधिकाधिक गांभीर्याने पाहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.