Home बातम्या राजकारण कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ

कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ

बंगळुरू: कर्नाटकमधील सत्तेचं नाटक सलग तिसऱ्या आठवड्यातही सुरूच आहे. विधानसभेत थोड्याच वेळात बहुमत चाचणी होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षात असलेल्या भाजपानं आजच बहुमत सिद्ध करण्याची मागणी केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या राजीनाम्याचं पत्र विधानसभेत त्यांच्याच टेबलवर दिसल्यानं एकच खळबळ उडाली. मात्र हे पत्र आणि त्यावरील स्वाक्षरी खोटी असल्याचं कुमारस्वामींनी सभागृहाला सांगितलं. कोणाला मुख्यमंत्रीपदी होण्याची इतकी घाई झाली आहे, असा सवाल करत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपा आणि माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना लक्ष्य केलं.  कर्नाटकच्या विधानसभेत थोड्याच वेळात बहुमत चाचणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुमारस्वामींचं सरकार अडचणीत आलं आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेतील एक व्हिडीओ समोर आला. यामध्ये कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र असल्याचं दिसत होतं. ‘मी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. माझा राजीनामा स्वीकारुन मला जबाबदारीतून मुक्त करावं,’ असा मजकूर या पत्रात दिसत आहे. राज्यपालांना लिहिलेल्या या पत्रावर मुख्यमंत्री कुमारस्वामींची स्वाक्षरी आणि आजची तारीखदेखील आहे. त्यामुळे कुमारस्वामी राजीनामा देणार का, अशी चर्चा सुरू झाली.  कुमारस्वामी यांच्या टेबलवरील राजीनाम्याचं पत्र समोर येताच मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. संबंधित पत्र बनावट असल्याचं त्यांच्या कार्यालयानं स्पष्ट केलं. यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देत थेट भाजपावर निशाणा साधला. ‘मी राज्यपालांकडे राजीनामा देत असल्याची माहिती मला मिळाली. नेमकं कोण मुख्यमंत्री व्हायची वाट पाहतंय, याची मला कल्पना नाही. कोणीतरी माझी बनावट स्वाक्षरी करुन बोगस पत्र सोशल मीडियावर व्हायरल केलं. इतक्या खालच्या पातळीवरील राजकारण पाहून मला धक्का बसला,’ अशा शब्दांमध्ये कुमारस्वामींनी भाजपावर टीका केली.