Home ताज्या बातम्या कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला ICJ ची स्थगिती

कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला ICJ ची स्थगिती

हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) मोठा दिलासा मिळाला आहे. जाधव यांच्या फाशीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शिवाय त्यांना भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याची परवानगीही देण्यात आली आहे. भारताच्या दृष्टीने हा मोठा विजय मानला जात आहे. 

भारताच्या बाजूने १५ विरुद्ध १ अशा मतांनी हा निकाल देण्यात आला. हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी साडेसहा वाजता सुनावणी सुरू झाली. मुख्य न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ निकाल वाचन केले. कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानकडून व्हिएन्ना कराराचे उल्लंघन झाले असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. 

पाकिस्तान जाधव यांना दिलेल्या शिक्षेचा पुनर्विचार करत नाही तोपर्यंत जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात येत असल्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायायलायने दिला. जाधव यांना भारतीय दूतावासाची मदत घेण्याची परवानगी पाकिस्तानने दिली नव्हती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांना काउन्सिलर अॅक्सेसही दिला. कुलभूषण प्रकरणी भारताने पाकिस्तान लष्करी न्यायालयाच्या निर्णयाला आंतरराष्ट्रीय न्यायालयात दिलेले आव्हान आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येते, हे आयसीजेने स्पष्ट केले. भारताच्या याचिकेला आव्हान देताना पाकिस्तानने केलेले युक्तीवाद आयसीजेने फेटाळून लावले. 

कुलभूषण जाधव यांना अटक केल्यानंतर पाकिस्ताननं भारतीय उच्चायुक्तांना याची माहितीही दिली नव्हती. त्यामुळं या खटल्यात व्हिएन्ना कराराचे कलम ३६ लागू होते, हे भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात सिद्ध केलं. भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांना जाधव यांना भेटण्याची परवानगी दिली गेली नाही. त्यांना कायदेशीर मदतही नाकारण्यात आली. व्हिएन्ना कराराच्या कलम ३६ (१) चं हे उल्लंघन होतं. जाधव यांना ३ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली. मात्र, पाकिस्तानी परराष्ट्र सचिवांनी भारतीय उच्चायुक्तांना ही माहिती २२ दिवसांनंतर दिली. या विलंबाचं कारण पाकिस्तान देऊ शकला नाही, हे सर्व मुद्दे भारताने न्यायालयात प्रभावीपणे मांडले. परिणामी व्हिएन्ना कराराच्या कलम ३६ (१) नुसार, जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार पाकिस्तान जोपर्यंत करणार नाही, तोपर्यंत कुलभूषण यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा स्थगित राहिल, असा महत्त्वपूर्ण निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आज दिला. भारताच्या दृष्टीने हा ऐतिहासिक विजय मानला जात आहे.

अटक कधी?

कुलभूषण जाधव यांना ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तान येथून पाकमधील गुप्तचर यंत्रणांनी अटक केली होती. कुलभूषण जाधव कमांडिंग ऑफिसर दर्जाचे नौदलातील अधिकारी आहेत व ते भारतातील ‘रॉ’साठी काम करीत असल्याचा दावा पाकिस्ताने केला होता. कुलभूषण जाधव हे पाकमध्ये हेरगिरी करीत होते, असा आरोपही पाकने केला होता. इराणमार्गे जाधव यांनी पाकमध्ये प्रवेश केल्याचे पाकिस्तानचे म्हणणे होते. 

काय झाली होती शिक्षा?

पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने एप्रिल २०१७ मध्ये हेरगिरी आणि दहशतवादाची कलमे लावून कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. पाकमधील लष्करी न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर भारताने या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला फटकारले होते. तीन दिवस चाललेल्या युक्तिवादानंतर आंतरराष्ट्रीय न्यायलयाने फाशीला स्थगिती दिली होती. या प्रकरणी अंतिम निकाल लागेपर्यंत फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होता कामा नये, असे न्यायालयाने पाकला बजावले होते.