Home ताज्या बातम्या कुळगाव- बदलापूरमधील पूर रेषेच्या फेरसर्वेक्षणाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

कुळगाव- बदलापूरमधील पूर रेषेच्या फेरसर्वेक्षणाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

0
कुळगाव- बदलापूरमधील पूर रेषेच्या फेरसर्वेक्षणाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई, दि. २८:- कुळगांव- बदलापूर शहरातून जाणाऱ्या पूर नियंत्रण रेषेचे नगरपरिषद आणि जलसंपदा विभागाने समन्वयाने फेरसर्वेक्षण करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. त्यासोबतच कोविड काळातील केलेल्या खर्चाचे तसेच नगरपरिषदेला मुद्रांक शुल्काचे अनुदानही लवकरात लवकर दिले जावे यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेशी निगडीत विविध विषयांबाबत सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, एमएमआरडीएचे सहआयुक्त विजय सूर्यवंशी, तसेच  बदलापूर नगर पंचायतीचे मुख्याधिकारी योगेश गोडसे, माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे आदी उपस्थित होते.

बैठकीत बदलापूर गावठाणाबाबतचा फेरबदल करून विकास योजनेमध्ये सुधारणा करण्याबाबतही चर्चा झाली. कुळगाव-बदलापूरमधून जाणाऱ्या उल्हास नदीच्या पूर नियंत्रण रेषेबाबत ज्या-ज्या भागातील तक्रार असेल, त्याठिकाणी नगरपरिषद आणि जलसंपदा विभागाने समन्वयाने फेरसर्वेक्षण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. याशिवाय बदलापूर नगरपरिषदेने नगरविकास विभागाकडे सादर केलेल्या ५३ कोटींच्या विविध विकास कामे, प्रकल्पांबाबतही चर्चा झाली. गेली काही वर्षे नगरपरिषदांना द्यावयाचे मुद्रांक शुल्काचे अनुदान थकित आहे. हे अनुदान देण्याबाबत कार्यवाहीचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला दिले.

बदलापूर नगरपरिषदेकडील अभियंता तसेच अनुषंगिक रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या.